हिंदुत्वनिष्ठ प्रवीण नेट्टारू हत्येतील आरोपी शाफी बेल्लारे याला जिहादी एस्.डी.पी.आय.कडून तिकीट !

कारागृहातून निवडणूक लढवणार !

डावीकडून हिंदुत्वनिष्ठ प्रवीण नेट्टारू आणि शाफी बेल्लारे

बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते प्रवीण नेत्तारू यांच्या हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी शाफी बेल्लारे याला येत्या विधानसभा निवडणुकीत पुत्तुरू विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवण्यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या बंदी घातलेल्या जिहादी संघटनेचा राजकीय पक्ष ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ने (एस्.डी.पी.आय.ने ) उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यानंतर एस्.डी.पी.आय.वर टीकेची झोड उठली आहे.

१. शाफी याला उमेदवारी देण्याचे समर्थन एस्.डी.पी.आय.चे नेते रियाज परांगीपेटे यांनी केले आहे. ते म्हणाले की, कायद्याने दिलेल्या चौकटीतच शाफी निवडणूक लढवणार आहे. निवडणुकीच्या वेळेला मिळणार्‍या जामिनाविषयी प्रयत्न करत आहोत. शाफी निवडून येण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता प्रचार करेल.

२. राज्याचे कन्नड आणि सांस्कृतिक, तसेच ऊर्जा मंत्री सुनील कुमार यांनी, ‘हिंदु कार्यकर्त्याची हत्या करण्याचा आरोप असलेल्या आरोपीला उमेदवार म्हणून घोषित केल्याने भीतीचे सावट पसरले आहे. समाजात उद्रेक निर्माण करणार्‍याला लोकशाहीचे मंदिर असलेल्या विधानसभेत घेऊन जाण्याचे कुकृत्य एस्.डी.पी.आय.चा भयानक मुखवटा स्पष्ट करते. समाजात चर्चा, वादविवाद झाले पाहिजेत. त्याऐवजी गोंधळ, भीतीदायक वातावरण निर्णाण होऊ नये. हत्येचा आरोप असलेल्या आरोपीला उमेदवारी देणे, हे पुन्हा दबाव तंत्र निर्माण करत आहे. समाजातील सज्जनांना, चांगल्या लोकांना संधी मिळाली पाहिजे. समाजातील घातक प्रवृत्तीला विरोध केला पाहिजे, अन्यथा आतंकवादी एस्.डी.पी.आय.च्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतील’, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

संपादकीय भूमिका 

यातून राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा कशा प्रकारे दुरुपयोग करण्याचा प्रयत्न जिहादी संघटनेच्या राजकीय पक्षाकडून केला जात आहे. आता या पक्षावरही बंदी घालण्याची आवश्यकता आहे !