बीबीसीच्या देहली आणि मुंबई येथील कार्यालयांचे आयकर विभागाकडून सर्वेक्षण

विरोध पक्षांकडून भाजप सरकारवर टीका

नवी देहली – आयकर विभागाने बीबीसीच्या देहली आणि मुंबई यांसहित ३० ठिकाणी सर्वेक्षण चालू केले आहे. देहली येथील सर्वेक्षणात ६० ते ७० अधिकार्‍यांचा समावेश आहे. १४ फेब्रुवारी सकाळपासून हे सर्वेेक्षण चालू होते. ‘ही धाड नसून सर्वेक्षण आहे’, असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे. या सर्वेक्षणाद्वारे बीबीसीचा आर्थिक हिशोब पडताळण्यात येत आहे. या सर्वेक्षणामुळे आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी बीबीसीच्या कार्यालयातील  कर्मचार्‍यांचे भ्रमणभाष बंद केले, तसेच कार्यालयाबाहेर येण्या-जाण्यावरही बंदी घातली. आयकर विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार बीबीसीवर आंतरराष्ट्रीय करामध्ये अनियमितता केल्याचा आरोप आहे. त्यासंबंधी हे सर्वेक्षण केले जात आहे.

१. काँग्रेसने या सर्वेक्षणावर टीका करतांना ट्वीट करत ‘ही अघोषित आणीबाणी आहे’, असे विधान केले आहे. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, आम्ही येथे अदानी यांच्या प्रकरणात संसदीय चौकशी समितीची मागणी करत आहोत आणि दुसरीकडे सरकार बीबीसीच्या मागे लागले आहे. ‘विनाशकाले विपरीतबुद्धिः ।’. (अर्थ : विनाशकाळ जवळ आल्यावर बुद्धी भ्रष्ट होत) (एक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था भारताच्या पंतप्रधानांची प्रतिमा मलीन करत असतांना त्याविषयी परस्पर हेवेदावे मिटवून संघटितपणे विरोध करणे आवश्यक असतांना अशी विधाने करणारे राष्ट्रघातकी काँग्रेसवाले ! – संपादक)

२. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा म्हणाल्या, ‘‘बीबीसीच्या कार्यालयांवर आयकर विभागाची छापेमारी… खूप छान… आश्‍चर्यकारक !’’

काय आहे बीबीसी ?

‘ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ म्हणजे ‘बीबीसी’. ही ब्रिटिश सरकारची संस्था आहे. ती ४० भाषांमध्ये बातम्यांचे प्रसारण करते. ब्रिटीश संसदेने संमत केलेल्या अनुदानावर ती चालते. तिचे व्यवस्थापन परराष्ट्र आणि राष्ट्रकुल कार्यालयांकडून चालवले जाते. बीबीसीचे कामकाज डिजिटल, संस्कृती, माध्यमे आणि क्रीडा विभागांतर्गत चालते. बीबीसीचा प्रारंभ वर्ष १९२७ मध्ये झाला.

काँग्रेसने बीबीसीवर बंदी घातली होती ! – भाजप

भाजपने या सर्वेक्षणाविषयी म्हटले की, इंदिरा गांधी यांनीही बीबीसीवर बंदी घातली होती, याची आठवण काँग्रेसने ठेवली पाहिजे. भारतात प्रत्येक संस्थेला कायद्याचे पालन करून काम करण्याची संधी दिली जाते; मात्र त्यासाठी तिचे काही छुपे धोरण नसावे. ‘काँग्रेस पक्ष चीन, बीबीसी, तसेच आतंकवाद्यांच्या बाजूने का उभा रहातो ?’, ‘काँग्रेस आयकर विभागाकडून केल्या जात असलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालाची वाट का पहात नाही ?’, ‘काँग्रेस आताच निष्कर्षापर्यंत का पोचत आहे ?’, असे प्रश्‍नही भाजपने केले.

संपादकीय भूमिका 

भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी बीबीसीने कोणतेही अवैध कृत्य केले जात असेल, तर त्याचा शोध घेतलाच पाहिजे ! भारतात राहून भारताची आणि हिंदूंची निंदा करणार्‍या बीबीसीकडून गैरव्यहार होत असेल, तर तिच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !