रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी करण्यात भारत पहिल्या क्रमांकावर !

मॉस्को – रशियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या ५ वर्षांत रशियाने भारताला सुमारे १३ अब्ज डॉलर्स म्हणजेच १ लाख कोटी रुपयांची शस्त्रे पुरवली आहेत. रशियामध्ये बनवलेल्या शस्त्रास्त्रांपैकी २० टक्के शस्त्रे केवळ भारत खरेदी करत आहे. युक्रेन युद्धामुळे रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांचा दोन्ही देशांतील शस्त्रास्त्रांच्या खरेदीवर कोणताही परिणाम झाला नाही. रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी करण्यात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

रशियाच्या ‘फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी टेक्निकल कॉर्पोरेशन’चे प्रमुख दिमित्री शुगायेव यांनी सांगितले, ‘‘भारताव्यतिरिक्त चीन आणि अनेक दक्षिण पूर्व आशियाई देश रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी करत आहेत. ‘रशियाकडून शस्त्रे खरेदी करू नयेत’, यासाठी अमेरिका आणि पाश्चात्य देश यांनी भारतावर पुष्कळ प्रमाणात दबाव आणला होता; मात्र भारताने या दबावाला बळी न पडता दोन्ही देशांमधील संबंध कायम ठेवले.’’