भाजपचे आमदार नितेश राणे यांचे हिंदु जनजागृती समितीला आश्वासन
कणकवली – आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, आरोग्यसेवा, धर्मांतर यांसह राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे प्रश्न मांडून आवाज उठवावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नितीन ढवण आणि श्री. मंगेश वरवडेकर यांनी आमदार राणे यांची शहरातील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन हे निवेदन दिले. या वेळी उभयतांमध्ये विविध प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा झाली. या वेळी आमदार राणे यांनी, ‘हे प्रश्न अधिवेशनात उपस्थितीत करून आवाज उठवू’, असे आश्वासन दिले.
या वेळी आमदार राणे म्हणाले, ‘‘समिती जी निवेदने देते ती अभ्यासपूर्ण असतात. सोबत आवश्यक ते कागदपत्र जोडलेले असतात. या विषयांवर जिल्ह्यातील विविध संघटनांना एकत्र करून सर्वांची नियमित एक बैठक आयोजित करा, तसेच या बैठकीला मीही असेन. या माध्यमातून प्रशासनाला विविध विषयांवर कारवाई करण्यास भाग पाडू शकतो, असे आमदार राणे यांनी सूचवले.
सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्स चिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग आणि प्रसुतीतज्ञ, बालरोगतज्ञ आदी श्रेणी १ च्या दर्जाची महत्त्वाची पदे संमत असून या पदांसह अन्य श्रेणींची पदेही मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत, तसेच विजयदुर्गचे संवर्धन करणे, मुंबई येथे आझाद मैदानात धर्मांधांनी केलेल्या दंगलीत झालेल्या हानीची वसुली करणे, अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण होणार्या ‘कॉन्व्हेन्ट’ शाळांची चौकशी करणे, ध्वनी प्रदूषण नियंत्रण मंडळाने हिंदूंच्या सणांच्या वेळी अधिक गुन्हे नोंदवणे; मात्र अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी ध्वनीप्रदूषणाविषयी अल्प गुन्हे नोंदवणे, राज्यात धर्मांतर बंदी कायदा लागू करणे, ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटनांची चौकशी करणे, वाशिम येथे पाकिस्तानचे झेंडे आणि औरंगजेबचे चित्र असलेले फलक फडकावल्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणे, वक्फ प्राधिकरणाचे कामकाज संकेतस्थळावर प्रकाशित करणे आदींविषयीचे प्रश्न आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.