-
पुनर्बांधणीचे काम पूर्ण
-
श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रमुख अतिथी असतील
पणजी, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – नार्वे, डिचोली येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाले आहे आणि या कामाचा जीर्णाेद्वार आणि लोकार्पण सोहळा ११ फेब्रुवारी या दिवशी केला जाणार आहे, अशी माहिती पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला पुरातत्व खात्याचे सचिव मिनिनो डिसोझा, खात्याचे संचालक नीलेश फळदेसाई आणि पुरातत्व खात्याचे वरद सबनीस यांची उपस्थिती होती.
मंत्री सुभाष फळदेसाई पुढे म्हणाले, ‘‘मंदिराच्या पुनर्बांधणीच्या बांधकामावर सुमारे ६ कोटी ५० लाख रुपये, विद्युतीकरणावर ६९ लाख रुपये आणि सल्लागारावर ५१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पुनर्बांधणी कार्यक्रम ९ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात येणार आहे. यामध्ये ९ आणि १० फेब्रुवारी या दिवशी विविध धार्मिक विधी होणार आहेत, तर ११ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ४ वाजता मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रमुख वक्ते या नात्याने इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.’’
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांवरील जलाने जलाभिषेक होणार
मंत्री सुभाष फळदेसाई पुढे म्हणाले, ‘‘सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याने पावन झालेले शिवनेरी, रायगड, राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर, लोहगड, प्रतापगड, सज्जनगड, अजिंक्यतारा, प्रतापगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, विसापूर, राजमाची, तुंग, तिकोणा, पारगड, बेतुल, फोंडा येथील गडांवरील जलांचे एकत्रीकरण करून जलाभिषेक करण्यात येणार आहे. या संगमात गोव्यातील विविध मंदिरांतील तळी आणि विहिरी यांचे पवित्र जल समाविष्ट करून हा विधी होणार आहे. जलाभिषेक ११ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९ ते ११ वाजता या शुभमुहूर्तावर होणार आहे.’’
सोहळ्याला सरदार घराण्यांच्या वंशजांची विशेष उपस्थिती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मैलाचा दगड ठरलेले सेवक आणि वारसदार यांना सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते, सरखेल कान्होजी आंग्रे, कान्होजी जेधे, येसाजी कंक, हिरोजी इंदुलकर, खंडो बल्लाळ, पिलाजी गोळे, शेलार मामा, सरदार बलकवडे, सरदार कदम आदी पराक्रमी सरदार घराण्यांतील वंशजांचा समावेश आहे. याबरोबरच शिवरायांच्या साम्राज्य उभारणीसाठी प्रत्यक्ष संबंध आलेले नरोराम शेणवी रेगे मंत्री, बक्षीबहाद्दर जिवबादादा केरकर, पुरोहित वाळवे, बक्षीबहाद्दर लखवादादा लाड, रामचंद्र मल्हार सुखटणकर आदी वारसदारांच्या वंशजांना निमंत्रित करण्यात आले आहे.’’
गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व असलेल्या मंदिराच्या जीर्णाेद्वाराचे काम करतांना मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व आणि पावित्र्य जपून ठेवण्यात आले आहे. गोव्याच्या पुरातत्व खात्याने जानेवारी २०१९ मध्ये मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. मंदिराचे पुरातत्व दृष्टीने महत्त्व अल्प होऊ नये आणि ‘कावी आर्ट’ संरक्षित रहावे, या दृष्टीने चांगल्या सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाले आहे.