बिहारमध्ये पी.एफ्.आय.च्या आणखी २ जिहादी कार्यकर्त्यांना अटक !

बिहार हा पी.एफ्.आय.चा अड्डा बनला आहे. तेथील जिहादी कारवाया समूळ नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक !

पाटलीपुत्र – चंपारण जिल्ह्यातून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) फुलवारी शरीफ प्रकरणात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.च्या) २ जिहादी कार्यकर्त्यांना अटक केली आहे. लक्ष्यित हत्या करण्यासाठी शस्त्रे आणि दारूगोळा पुरवण्याचा या दोघांवर आरोप आहे. महंमद अबिद आणि तन्वीर रझा अशी अटक करण्यात आलेल्या जिहाद्यांची नावे आहेत. मागील वर्षी म्हणजे जुलै २०२२ मध्ये फुलवारी शरीफ येथील पोलिसांनी देशविरोधी कारवाया केल्याच्या प्रकरणात तेथील पी.एफ्.आय.च्या ५ कार्यकर्त्यांना अटक केली होती. या घटनेनंतर एन्.आय.ए.ने पी.एफ्.आय.च्या तमिळनाडू आणि कर्नाटक येथील तळांवरही धाडी टाकल्या होत्या. या प्रकरणाच्या अंतर्गत बिहारमध्ये धाडसत्र चालू आहे.

एन्.आय.ए.च्या अधिकार्‍यांनी बिहारमध्ये नालंदा, कटिहार, आरिया, मधुबनी, पाटणा, वैशाली, दरबंगा, मुझफ्फरपूर आणि सारण या ९ जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी धाडी टाकल्या. पी.एफ्.आय.वर बंदी घातल्यानंतर संघटनेने सशस्त्र प्रशिक्षण देणे बंद केले असून जिहादी कारवाया करण्याच्या पद्धतीत पालट केला आहे. सध्या पी.एफ्.आय.चे जिहादी कार्यकर्ते भूमीगत राहून काही लोकांना लक्ष्य करण्याचा कट रचत आहेत, असे पुढे आले आहे.