स्‍मारक म्‍हणून जतन करण्‍यात येणारी नौदलाची ‘टी-८०’ युद्धनौका कल्‍याण खाडीकिनारी ठेवणार !

टी-८० युद्धनौका

ठाणे, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्‍वराज्‍याच्‍या पहिल्‍या आरमाराची कल्‍याण येथे स्‍थापना केली. महाराजांची दूरदृष्‍टी आणि पराक्रमाची साक्ष म्‍हणून कल्‍याणच्‍या खाडी किनार्‍याची ओळख आहे. कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिकेच्‍या ‘स्‍मार्ट सिटी’ प्रकल्‍पांतर्गत दुर्गाडी गडाजवळ असलेल्‍या खाडीकिनारी नौदल संग्रहालय उभारण्‍यात येणार आहे. या संग्रहालयात नौदल सामर्थ्‍याचे दर्शन होेण्‍यासाठी भारतीय नौदलाच्‍या सेवेतून निवृत्त झालेली ‘टी-८०’ ही युद्धनौका स्‍मारक म्‍हणून जतन करण्‍यात येणार आहे. या युद्धनौकेचे ५ फेब्रुवारीच्‍या रात्री दुर्गाडी खाडीकिनारी आगमन झाले.

‘शिवकाळापासून ते आतापर्यंतच्‍या आरामाराचे दर्शन होणारे’ एखादे संग्रहालय असावे म्‍हणून माजी आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्‍या संकल्‍पनेतून दुर्गाडी खाडी किनारी नौदल संग्रहालय उभारण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. महानगरपालिकेच्‍या स्‍मार्ट सिटी अस्‍थापनाकडून या प्रकल्‍पाची आखणी, नियोजन आणि निधी खर्च केला जाणार आहे.