वर्धा येथे चालू असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी साहित्यातील उद्यम आणि अर्थविषयक लेखन, कृषी जीवनातील अस्थिरता, प्रक्षोभ आणि मराठी लेखक असे विषय परिसंवादासाठी घेतले होते. वास्तविक त्यापेक्षाही गंभीर समस्या उदा. लव्ह जिहादच्या घटना, स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना, धर्म आणि राष्ट्र यांच्या अवमानाच्या विरोधात होणारे जनतेचे संघटन, लोकसंख्या नियंत्रण, जागृत हिंदूंचे निघणारे प्रचंड संख्येतील मोर्चे, कौटुंबिक समस्या, लिव्ह इन रिलेशनशिप यांमुळे निर्माण होणार्या समस्या असे अनेक ज्वलंत विषय आहेत; मात्र त्याची या परिसंवादामध्ये कुठेच चर्चा नाही. यामुळे साहित्याची नाळ या अशा समस्यांशी तुटलेली आहे का ? साहित्य संमेलन केवळ संबंधितांचे एकत्र येण्याचे आणि वेळ घालवण्याचे ठिकाण झाले आहे का ? असे प्रश्न संमेलनासाठी उपस्थित नागरिकांच्या मनात निर्माण झाले.
अलिकडेच श्रद्धा वालकरच्या हत्येचे प्रकरण संपूर्ण भारतात गाजत असतांना त्यावर परिसंवाद घ्यावा, असे संमेलनाच्या आयोजकांना वाटले नाही. यावरून साहित्यिकांना समाजाशी काही देणे-घेणे नाही, असेच वाटते. साहित्य संमेलनातून समाजाला दिशा देणे, त्यांना संघटित होण्यासाठी परिसंवादातून बळ देणे अपेक्षित आहे.
संमेलनासाठी शासनाकडून २ कोटी रुपयांचे साहाय्य मिळाले आहे; मात्र त्यातून समाज आणि राष्ट्र यांना जागृत करणारी चर्चा होणे अपेक्षित आहे. सहस्रोंच्या संख्येने मुसलमानेतर समाजातील मुलींचे लव्ह जिहादच्या माध्यमातून जीवन उध्वस्त झाले आहे आणि होत आहे. कुटुंबांमध्ये वाढत चाललेला एकलकोंडेपणा, मानसिक व्याधींची ग्रस्तता यांवर संमेलनात कुठेही वाच्यता झालेली नाही. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सूज्ञ नागरिकांना पुष्कळ अपेक्षा असतात. संमेलनातून आम्हाला वैचारिक आणि उपायात्मक काहीतरी सल्ला मिळेल, अशी अपेक्षा असते. ही अपेक्षा या संमेलनातून दिसली नाही.
देशात अनेक समस्या असतांना त्यावर संमेलनात कोणतीही चर्चा होत नाही. आपण या समाजाचे देणे लागतो, ही जाणीव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात असणे, हे जिवंतपणाचे लक्षण आहे; मात्र सध्याच्या संमेलनाच्या भव्यतेत महत्त्वाच्या गोष्टी विसरत आहोत, असे जाणवते. समाजाला दिशा देण्याचे कार्य साहित्य संमेलनातून व्हावे. हा देश एकसंघ व्हावा, यासाठी साहित्यिकांना त्याची जाणीव व्हावी, अशी अपेक्षा !
– श्री. लहू खामणकर, यवतमाळ