अमेरिकेतील संवेदनशील भागात आकाशात आढळला हेरगिरी करणारा चिनी फुगा !

अमेरिकेचा चीनवर हेरगिरीचा आरोप !

वॉशिंगटन – अमेरिकेतील मॉन्‍टाना भागात असलेल्‍या हवाईदलाच्‍या संवेदनशील भागाच्‍या वर आकाशात हेरगिरी करणारा एक चिनी फुगा आढळला. पेंटागॉनचे प्रवक्‍ते ब्रिगेडिअर जनरल पैट राइडर यांनी ही माहिती दिली असून मॉन्‍टाना क्षेत्रामध्‍ये अमेरिकेची ३ परमाणू क्षेपणास्‍त्रे तैनात आहेत. अमेरिकेचे परराष्‍ट्रमंत्री अँटनी ब्‍लिंकन लवकरच बीजिंगच्‍या दौर्‍यावर जाणार आहेत. त्‍याअगोदरच ही घटना घडली आहे.

१. अमेरिकी सैन्‍य आणि जनता यांच्‍या दृष्‍टीने या फुग्‍यामध्‍ये धोकादायक असे काहीही नाही. त्‍यामुळे अमेरिकेचा हा फुगा पाडण्‍याचा विचार नसून अमेरिकी सैन्‍याचे त्‍याकडे लक्ष आहे, असे अमेरिकेने स्‍पष्‍ट केले.

२. हा फुगा किती उंचीवर उडत आहे, हे अमेरिकेने स्‍पष्‍ट केले नसले, तरी नागरी विमाने ज्‍या उंचीवर उडतात त्‍यापेक्षा अधिक उंचीवर तो असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे.

३. चीनने यावर म्‍हटले की, आम्‍ही या बातमीची नोंद घेतली असून हवाई क्षेत्राचे उल्लंघन करण्‍याचा आमचा कोणताच उद्देश नसून आम्‍ही कायद्याचे पालन करतो.

४. गेल्‍या वर्षी तैवानच्‍या प्रश्‍नावरून चीन आणि अमेरिका यांच्‍यामध्‍ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.