धर्मात राजकारण नको; मात्र राजकारणी धार्मिक असायला हवा ! – श्री श्री रविशंकर

नांदेड येथे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा महासत्संग !

नांदेड – राजकारणात वैयक्तिक द्वेष असू नयेत. राजकारणात मतभेद असावेत; परंतु लोककल्याण आणि गावविकासासाठी मतभेद असता कामा नयेत. सत्ताधारी पक्षासमवेतच विरोधी पक्षही असणे आवश्यक आहे. राजकीय व्यक्तींनी मतभेद विसरून विकासाची कामे करावीत. धर्मात राजकारण नसावे; पण राजकीय मंडळींनी धार्मिक असावे, असे मार्गदर्शन ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी येथे केले. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने १ फेब्रुवारी या दिवशी येथील मामा चौक मैदानात गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या महासत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी ताणतणाव घालवण्यासह यशस्वी जीवन जगण्याचा कानमंत्र शिष्य परिवारासह उपस्थित नागरिकांना दिला.

श्री श्री रविशंकर म्हणाले की,…

१. प्रत्येकाच्या जीवनात समस्या येतात. भगवान श्रीकृष्ण, श्रीराम आणि गौतम बुद्ध यांच्याही आयुष्यात समस्या आल्या होत्या.

२. प्रति ४० सेकंदाला १ व्यक्ती आत्महत्या करते. यासाठी मानसिक आरोग्य राखून मनाला सांभाळणे आवश्यक आहे. आपल्या पूर्वजांनीही धर्मासाठी आदर्श घालून दिले आहेत. जीवन हे आदर्श आहे, याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे.

३. मनाला चेहरा नाही, तर शरिराला आहे. आमचा संबंध मनासमवेत आहे. आपण माता, पिता, गुरु आणि अतिथी यांचा सन्मान करतो, ही संस्कृती आहे. ती पुढच्या पिढीत निर्माण करा. कुणाचाही अनादर करू नका.

क्षणचित्रे

१. श्री श्री रविशंकर यांनी सोहळ्याच्या आगमनापूर्वी प्रथम सचखंड श्री हजुरसाहिब येथे जाऊन आशीर्वाद घेतले.

२. गुरुद्वारा श्री लंगर साहिबजींच्या वतीने संतबाबा श्री. बलविंदरसिंघजी, सचखंड श्री हजुर साहिब यांच्या वतीने संत बाबा श्री रामसिंघजी, श्री मातासाहेब गुरुद्वारा यांच्या वतीने श्री श्री रविशंकर यांचा सन्मान करण्यात आला.