श्रीरामाच्या मूर्तीसाठीच्या शाळिग्राम शिळा नेपाळमधून अयोध्येत पोचल्या !

नेपाळमधून अयोध्येत पोचलेल्या शाळिग्राम शिळा

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या भव्य श्रीराममंदिरात स्थापित करण्यासाठी बनवण्यात येणार्‍या श्रीरामाच्या मूर्तीसाठी नेपाळमधील गंडकी नदीतून दोन शाळिग्राम शिळा शोधण्यात आल्या आहेत. त्या यात्रेद्वारे नेपाळमधून अयोध्येत आणण्यात आल्या आहेत. शरयू नदीच्या पुलावर भाविकांनी पुष्पवृष्टी करून आणि ढोल वाजवून त्यांचे स्वागत केले. ६ कोटी वर्षे जुन्या या शाळिग्राम शिळांपासून भगवान श्रीराम आणि देवी सीता यांच्या मूर्ती बनवल्या जाणार आहेत.

ओडिशा आणि कर्नाटक राज्यांतूनही शिळा आणण्यात येणार !

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, आम्ही भगवान श्रीरामाच्या मंदिरासाठी कोणत्या पद्धतीने मूर्ती बनवायची आणि ही मूर्ती कोणत्या शिळांपासून बनवायची, याचा विचार करत आहेत. त्यासाठी देशभरातील मूर्तीकारांना पाचारण करून त्यांची मते जाणून घेतली आहेत. ‘देवाच्या मूर्तीचे हावभाव कसे असावेत’, याचा सखोल विचार केला जात आहेत. ओडिशा आणि कर्नाटक राज्यांतूनही शिळा आणण्यात आल्या आहेत; मात्र त्यांच्या आगमनाची वेळ अद्याप ठरलेली नाही. सर्व शिळा गोळा केल्यानंतर तज्ञांचा सल्ला घेऊनच गर्भगृहातील मूर्ती कोणत्या शिळेपासून बनवायची, याचा निर्णय घेतला जाईल.