श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी नेपाळच्या गंडकी नदीतून शोधण्यात आली शाळिग्राम शिळा !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीसाठी नेपाळमधील गंडकी नदीच्या परिसरातून ७ फूट बाय ५ फूट आकाराची शाळिग्राम शिळा शोधून काढण्यात आली. मूर्तीसाठी शिळा शोधण्यासाठी मंदिर ट्रस्टचे सदस्य कामेश्‍वर चौपाल यांना नेपाळच्या गंडकी नदी परिसरात पाठवण्यात आले होते. जनकपूरमध्ये २७ जानेवारीला वसंत पंचमीच्या दिवशी शिळेची विधीवत् पूजा केली जाईल. त्यानंतर ही शिळा जनकपूरहून मधुबनी-दरभंगा मार्गाने २ फेब्रुवारीपर्यंत अयोध्येत आणली जाणार आहे. या शिळेद्वारेच श्रीरामाची साडेपाच फूट उंचीची उभ्या मुद्रेतील मूर्ती घडवण्यात येणार आहे.

शाळिग्राम शिळेद्वारे घडवलेल्या मूर्तीमुळे ६ लाभ होतात !

कामेश्‍वर चौपाल यांनी सांगितले की, नेपाळमधील भाविकांना जेव्हा कळले की, या शिळेपासून अयोध्येतील रामललाची मूर्ती साकारली जाणार आहे, तेव्हापासून त्यांच्यामध्ये या शिळेची पूजा आणि स्वागत करण्यासाठी फार उत्साह आहे.

ही शाळिग्राम शिळा अत्यंत महाग आहे; मात्र नेपाळ सरकारच्या साहाय्याने ती मिळवण्यात आली आहे. गंडकी नदीतील ही शिळा निवडण्यासाठी नेपाळच्या पुरातत्व विभागाच्या तज्ञांचे साहाय्य घेण्यात आले होते. या शाळिग्राम शिळेला धार्मिक महत्त्व आहे. यावरच भगवान विष्णूंचे निवासस्थान असल्याचे मानले जाते. शाळिग्राम शिळेद्वारे घडवलेल्या मूर्तीद्वारे सुखी जीवन, समृद्धी, वाईट शक्तींपासून संरक्षण, उत्तम आरोग्य, वैश्‍विक आनंद आणि देवाची कृपा हे ६ लाभ होतात, अशी मान्यता आहे.

श्रीरामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता मूर्तीवर सूर्यकिरण पडणार ! – श्रीराम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय

श्रीराम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील नामवंत कारागिरांचे ३ सदस्यीय पथक श्रीरामाच्या मूर्तीचा आराखडा आणि प्रतिकृती सिद्ध करण्यासाठी काम करत आहेत. उभ्या मूर्तीची अनेक छोट्या प्रतिकृती आतापर्यंत बनवण्यात आल्या आहेत. मंदिर ट्रस्ट त्यांपैकी कोणत्याही एकाची निवड करील. ही मूर्ती साडेपाच फूट उंच असेल. याच्या खाली अनुमाने ३ फूट उंचीचा चबुतरा असेल. खगोलशास्त्रज्ञ मंदिराच्या रचनेसाठी विशेष व्यवस्था करत आहेत, जेणेकरून श्रीरामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता प्रभु श्रीरामांचा जन्म झाल्यावर सूर्याची किरणे रामललाच्या कपाळावर पडून ती प्रकाशमान होतील. पुढील वर्षी जानेवारीमध्ये मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर भव्य श्रीराममंदिरात रामललाच्या अभिषेकाचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे.