ऑस्ट्रेलियात खलिस्तानवाद्यांकडून तिसर्‍या हिंदु मंदिराची तोडफोड !

भिंतीवर केले भारतविरोधी लिखाण !

मेलबर्न (आस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा खलिस्तानवाद्यांकडून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करण्याची घटना घडली. खलिस्तानवाद्यांनी येथील अल्बर्ट पार्क येथे असलेल्या हिंदु मंदिराची तोडफोड केली, तसेच येथील भिंतीवर भारतविरोधी लिखाण केले. याआधी १७ जानेवारीला मेलबर्नमधीलच बी.ए.पी.एस्. स्वामीनारायण मंदिरावर आक्रमण करण्यात आले होते. आस्ट्रेलियात गेल्या १५ दिवसांत ३ मंदिरांवर आक्रमण करण्यात आले आहे.

मेलबर्नमध्ये आता आक्रमण झालेले मंदिर ‘हरे कृष्ण मंदिर’ या नावाने ओळखले जाते. ते ‘इस्कॉन’ या संस्थेचे मंदिर आहे. मेलबर्नमधील भक्ती योग आंदोलनाचे ते प्रमुख केंद्र आहे. २३ जानेवारीला सकाळी मंदिराचे व्यवस्थापन करणार्‍यांना मंदिराची तोडफोड झाल्याचे निदर्शनास आले, तसेच त्यांना मंदिराबाहेरील भिंतीवर ‘खालिस्तान झिंदाबाद’, ‘हिंदुस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा लिहिल्याचेही दिसले.

खलिस्तानवाद्यांवर कारवाई करण्यात पोलीस अपयशी !

इस्कॉन मंदिराचे माहिती तंत्रज्ञान सल्लागार शिवेश पांडे यांनी सांगितले की, शांतीप्रिय हिंदु समाजाला दुखावण्याचे काम करणार्‍या आणि द्वेष पसरवणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करण्यात व्हिक्टोरिया पोलीस मागील १५ दिवसांपासून अपयशी ठरले आहेत. व्हिक्टोरियातील नेत्यांनी दोनच दिवसांपूर्वी बहुसांस्कृतिक आयोगासमवेत  एक आपत्कालीन बैठक आयोजित केली होती. त्याच्या काही कालावधीनंतरच हे तिसरे आक्रमण करण्यात आले आहे. यात खलिस्तानी समर्थक हिंदु समाजाच्या विरोधात द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत.

याआधी खलिस्तानी समर्थकांनी व्हिक्टोरिया येथील शिव विष्णु मंदिरावर आक्रमण केले होते.

संपादकीय भूमिका

कॅनडाप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही खलिस्तानी चळवळ चालू झाली असून त्याला ऑस्ट्रेलियात कोण खतपाणी घालत आहे ?, याचा  भारताने ऑस्ट्रेलिया सरकारला शोध घ्यायला लावून त्यांच्यावर कारवाई करायला भाग पाडले पाहिजे, असेच भारतियांना वाटते !