पुणे येथील ‘हिंदु जनआक्रोश मोर्च्या’त १० सहस्रांहून अधिक हिंदु धर्माभिमान्यांचा सहभाग !
पुणे – संपूर्ण भारतामध्ये ‘धर्मांतर’, ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात कायदे झाले पाहिजेत. ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतर’ हे संपूर्ण भारतामध्ये नियोजनबद्धरित्या केले जात आहे. हे आताच थांबवायला पाहिजे. हा मोर्चा केवळ प्रारंभ आहे. अनेक क्रांतीकारी लढायांचा आरंभ पुण्यनगरीतूनच झाला आहे. हे कायदे लवकर झाले नाहीत, तर असे मोर्चे आपल्याला प्रत्येक गावात, तालुक्यात काढून सरकारला जागे करून कायदा सिद्ध करण्यास बाध्य केले पाहिजे, असे आवाहन तेलंगाणातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार राजासिंह ठाकूर यांनी केले. ते पुणे येथे सकल हिंदूंंच्या वतीने ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’च्या समारोप प्रसंगी बोलत होते.
महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण भारतामध्ये ‘लव्ह जिहाद’वर बंदी यावी, ‘धर्मांतर’विरोधी कायदा व्हावा, गोहत्या बंद व्हाव्यात या मागणीसाठी ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. मोर्च्याचा प्रारंभ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या महाआरतीने करण्यात आला. मोर्च्यामध्ये १० सहस्रांहून अधिक हिंदू धर्माभिमानी सहभागी झाले होते. सर्वत्र भगवे झेंडे, टोपी घालून धर्माभिमानी सहभागी झाले होते. ‘छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू ज्या दिवशी झाला तो दिवस ‘बलीदानदिन’ म्हणून साजरा करण्यात यावा’, अशी मागणी टी. राजासिंह यांनी या वेळी केली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘‘आपण लहानपणापासून छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर’ होते, असे शिकलो आणि ऐकले आहे. आजपर्यंत जो इतिहास वाचला तो ‘धर्मवीर संभाजी महाराज’ म्हणून वाचला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख ही ‘धर्मवीर’ म्हणूनच आहे. हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्याला विरोध म्हणून आपण संघटित होऊन अशा स्वरूपाचे अनेक मोर्चे काढले पाहिजेत.
हिंदुराष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर’ नव्हते’, असे म्हणणारे अफझलखानाच्या कुळातील असावेत. आपण ‘पुण्येश्वर’ मुक्त करण्यासाठी लढा दिला पाहिजे.’’
टी. राजासिंह यांनी मांडलेली अन्य सूत्रे
१. ‘गाय’ ही आमची माता आहे. तिची होत असलेली हत्या आपण सहन करता कामा नये.
२. भारतातील हिंदूंनी एक बोट उचलले (मतदान केले) आणि हिंदूंचा पंतप्रधान झाला आहे. तेव्हा आपण सर्वजण जाती-पाती विसरून एकत्र झालो, तर ‘काय परिणाम होईल’, याचा विचार करा.
३. मला अटक केली. माझा आवाज दाबायचा प्रयत्न केला. हिंदूंच्या आशीर्वादामुळे मी बाहेर आलो. मी केवळ ‘श्रीराम’ म्हटले, तरी तेलंगाणा सरकार मला अटक करते. मला धर्माचे काम करतांना मरण आले, तर मी धन्य समजेन. धर्मासाठी जीव देणे, हे पुण्याचे काम आहे. जोपर्यंत जगणार तोपर्यंत हिंदुत्वाचे कार्य करणार.
४. महाराष्ट्रासारखे हिंदुत्व इतरत्र कुठेच दिसून येत नाही. संभाजी महाराज हे ‘धर्मवीर’ आहेत. त्यांनी धर्माकरता मरण पत्करले आहे. त्यांनी धर्माकरताच बलीदान केले आहे. नेहमीच हिंदुत्वाविषयी बोलले पाहिजे.