आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ‘शाहरूख खान यांना ओळखत नाही’ असे विधान केल्यावर खान यांच्याकडून मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना दूरभाष !

आसाममध्ये खान यांच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाला होणार्‍या विरोधाकडे लक्ष देण्याची केली विनंती !

शाहरूख खान व हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – येथे २१ जानेवारीला पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी अभिनेते शाहरूख खान यांचा आगामी ‘पठाण’ चित्रपट पहाण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच या वेळी त्यांनी ‘कोण शाहरूख खान? मी त्याला ओळखत नाही. मला त्याच्या चित्रपटाविषयीही माहिती नाही’, असे विधान केले. त्यानंतर मुख्यमंत्री सरमा यांनी २२ जानेवारीला सकाळी ट्वीट करून माहिती देतांना सांगितले की, शाहरूख खान यांनी मला २१ जानेवारीच्या मध्यरात्री २ वाजर्‍याच्या सुमारास दूरभाष केला. खान यांना गौहत्तीमधील नरेंगी हॉलमध्ये होणार्‍या ‘पठाण’च्या प्रदर्शनाविषयी काळजी वाटत होती. मी त्यांना ‘कायदा आणि सुव्यवस्था राखणे राज्यशासनाचे कर्तव्य असल्याचे सांगून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी कोणताही वाद होणार नाही याची काळजी घेतली जाईल’, असे आश्‍वासन दिले.

आसाममधील अनेक शहरांत ‘पठाण’च्या विरोधात निदर्शने चालू आहेत. २० जानेवारीला नरेंगी येथील एका चित्रपटगृहात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. त्यात शाहरूख खान यांचे भित्तीपत्रक जाळून टाकण्यात आले होते. या चित्रपटात भगव्या रंगाचा अवमान करण्यासह चित्रपटामध्ये अश्‍लीलता दाखवण्यात आल्याने त्याला विरोध होत आहे.

आसामी लोकांनी हिंदी नाही, तर आसामी चित्रपट पहावेत !  

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सरमा यांनी शाहरूख खान यांच्याविषयी विधान केल्यावर पत्रकारांनी त्यांना शाहरूख खान मोठा अभिनेता असल्याचे सांगितले. त्यावर सरमा म्हणाले ‘‘राज्यातील लोकांनी हिंदीची नव्हे, तर आसामी चित्रपटांची काळजी करावी. दिवंगत निपोन गोस्वामी निर्मित ‘डॉ. बेजबरुआ-पार्ट २’ हा आसामी चित्रपट लवकच प्रदर्शित होणार आहे. नागरिकांनी तो अवश्य पहावा’, असे आवाहन केले.