श्री कालीमातेला सिगरेट ओढतांना दाखवणार्‍या चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या अटकेला स्थगिती !

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

नवी देहली – श्री कालीमातेचे आक्षेपार्ह चित्र प्रसारित करणार्‍या चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. लीना यांनी त्यांच्या माहितीपटामध्ये श्री कालीमातेला हातात समलैंगिकतावाल्यांचा झेंडा घेऊन सिगरेट ओढतांना दाखवले होते. याचा देशभरातून विरोध झाला होता. उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, देहली आणि अन्यत्र गुन्हे नोंदवण्यात आले होते. यावरून न्यायालयाने सर्व राज्यांना नोटीस बजावून या गुन्ह्यांवरून कारवाई न करण्यास सांगितले आहे. या प्रकरणांवर २० फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.

न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, लीना यांच्या अधिवक्त्यांनी सांगितले की, याचिकाकर्त्या कॅनडातील यॉर्क विश्‍वविद्यालयाच्या पदवीधर आहेत. त्यांनी ‘काली’ या एका लघुपटाची निर्माती केली आहे. यातून कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नाही. लघुपटाचा उद्देश देवीला एक सर्वसमावेशी अर्थाने चित्रित करण्याचा होता.

नूपुर शर्मा आणि लीना मणिमेकलाई यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या भूमिकेविषयी जनतेत चर्चा !

लीना यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जी भूमिका घेतली, ती यापूर्वी नूपुर शर्मा यांच्या प्रकरणात घेतली नव्हती, असे समाजातून म्हटले जात आहे. नूपुर शर्मा यांनी इस्लामी पुस्तकाचा संदर्भ देत पैगंबरांच्या पत्नीविषयी विधान केले होते. त्या वेळी न्यायालयाने नूपुर शर्मा यांना देशातील असंतोषाला उत्तरदायी ठरवले होते, तसेच देशातील शर्मा यांच्या विरोधातील याचिका एकाच ठिकाणी सुनावणीवरही कठोर टीपणी केली होती. यासह न्यायालयाने ‘नूपुर शर्मा देशाच्या सुरक्षेला धोकादायक आहेत’ असेही विधान केले करत त्यांना ‘अहंकारी’, ‘दुराग्रही’, ‘फटकळ’ आदी शब्दांचा वापर करत फटकारले होते. तसेच देशाची क्षमा मागण्यास सांगितले होते. याउलट लीना यांच्या प्रकरणात न्यायालयाचा दृष्टीकोन वेगळा दिसून येत आहे, असे म्हटले जात आहे.