गोवा : पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी जागा सुचवण्यासाठी तज्ञ समिती

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे !

पणजी, २० जानेवारी (वार्ता.) – पोर्तुगिजांनी त्यांच्या राजवटीत उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्याविषयी अर्ज आले आहेत. त्यांची पडताळणी करून या मंदिरांची पुनर्बांधणी करण्यासाठी योग्य जागांची निवड करण्यासाठी सरकारने तज्ञांच्या समितीची नियुक्ती केली आहे. सरकारने दिलेल्या या आदेशामध्ये ३० दिवसांत या समितीने यासंबंधीचा अहवाल आणि तिच्या सूचना सादर कराव्यात, असे म्हटले आहे.

फर्मागुडी येथील पी.ई.एस्. महाविद्यालयाच्या इतिहास विषयाच्या प्रमुख प्राध्यापिका डॉ. वर्षा कामत या समितीच्या प्रमुख असून डॉ. रोहित फळगांवकर, डॉ. वरद शबनीस, बालाजी शेणॉय, उल्हास के. प्रभुदेसाई हे या समितीचे इतर सदस्य आहेत. उद्ध्वस्त करण्यात आलेल्या मंदिरांची डागडुजी किंवा पुनर्बांधणी करण्यासाठी सरकारने २० कोटी रुपये संमत केले आहेत. अशा प्रकारच्या मंदिरांच्या जागांची माहिती देण्याविषयी सरकारने लोकांकडून अर्ज मागवले होते. या अर्जांची पडताळणी समितीकडून करण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

ज्या स्थानावरील मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली होती, त्याच जागी त्यांची पुनर्बांधणी करण्यास कोणती अडचण आहे ? वेर्णा येथे श्री महालसादेवीचे मंदिर काही वर्षांपूर्वी तिच्या मूळ जागी बांधण्यात आले, तशी अन्य मंदिरे त्याच ठिकाणी बांधता येतील का ? असे पहावे, ही हिंदूंची अपेक्षा !