कणकवली – मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली शहरानजीकच्या हळवल फाट्यावरील अवघड वळणावर १९ जानेवारी या दिवशी पहाटे ५.३० वाजता पुण्याहून गोवा येथे जाणारी खासगी आरामबस उलटून अपघात झाला. या अपघातात शैलजा प्रेमानंद माजी (दोडामार्ग) आणि अण्णा गोविंद नाले (सातारा) हे २ प्रवासी ठार झाले, तर ३० प्रवासी घायाळ झाले आहेत. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, डॉ. अभिजीत आपटे आदी अनेकांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली.
अपघातातील घायाळांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात, तसेच येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
हळवल येथील धोकादायक वळणावर वारंवार अपघात होत असतात. असे असूनही महामार्गाचे काम करणारे ठेकेदार, आस्थापन आणि प्रशासन यांच्याकडून या समस्येवर ठोस उपाययोजना काढण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील माणगावजवळ रेपोली येथेही पहाटे ५ वाजता चारचाकी आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. यामध्ये १० जणांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला. या अपघातात अनिता संतोष सावंत या सावंतवाडी तालुक्यातील महिलेचा मृत्यू झाला.