ठाणे येथे गाडीच्‍या धडकेत २ पोलीस हवालदार घायाळ !

ठाणे, १९ जानेवारी (वार्ता.) – वेगाने जात असलेल्‍या गाडीची धडक बसून झालेल्‍या अपघातात २ पोलीस हवालदार घायाळ झाले असून त्‍यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. १८ जानेवारीला संध्‍याकाळी ठाणे साकेत येथील पोलीस मैदान परिसरातील रस्‍त्‍यावरून लक्ष्मण गायकवाड आणि सुरेश हे दोघे हवालदार दुचाकीवरून जात होते. मागून वेगाने आलेल्‍या वॅगनआर् गाडीने त्‍यांना धडक दिली. या अपघातात सुरेश आणि लक्ष्मण गायकवाड यांना गंभीर इजा झाली असून ठाणे येथील एका खासगी रुग्‍णालयात त्‍यांच्‍यावर उपचार चालू आहेत. या प्रकरणी गाडीच्‍या चालकाला अटक करण्‍यात आली असून त्‍याची चौकशी चालू असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली.