सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन ‘सप्तपदी’ या लेखमालेत हे ६ वे पुष्प गुंफत आहे. आजच्या विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी महर्षि कण्व यांनी शकुंतलेला विवाह संस्कारापूर्वी एक उपदेश केला होता, तो पाहूया.
१. महर्षि कण्व यांनी शकुंतलेला ‘गृहिणी’ या पदाची व्याख्या सांगतांना केलेला उपदेश
शुश्रूषस्व गुरून् कुरु प्रियसखीवृत्तिं सपत्नीजने भर्तुर्विप्रकृताऽपि रोषणतया मा स्म प्रतीपं गम: ।
भूयिष्ठं भव दक्षिणा परिजने भाग्येष्वनुत्सेकिनी यान्त्येवं गृहिणीपदं युवतयो वामाः कुलस्याधय: ॥
– शाकुंतल, अंक ४, श्लोक १८
अर्थ : (सासरी गेल्यानंतर) वडीलधार्या माणसांची सेवा कर, समतुल्य वयाच्या स्त्रियांशी सखीप्रमाणे मैत्री ठेव, पतीशी मतभेद झाले, तरी रागावून त्याच्या मनाविरुद्ध वागू नकोस; सेवकांशी अत्यंत सौजन्याने वाग आणि वैभव मिळाले, तरी गर्व करू नकोस. अशा प्रकारे वागणार्या स्त्रियांना ‘गृहिणी’ ही पदवी प्राप्त होते आणि याच्या विपरित वर्तन असणार्या स्त्रिया कुळाला कलंक ठरतात.
महर्षि कण्व शकुंतलेला ‘गृहिणी’ या पदाची व्याख्या सांगतांना फार उत्तम उपदेशकर्ते झाले. ते म्हणतात, ‘‘हे शकुंतले, तू विवाहानंतर पतीगृही गेल्यानंतर गुरुजन आणि ज्येष्ठ मंडळी यांची उत्तम सेवा कर. तुझ्या समतुल्य वयाच्या स्त्रियांशी ‘सखी’प्रमाणे मैत्री ठेव. मैत्रीच्या नात्यात ईर्ष्या आणि कटुता ठेवू नकोस. पतीसेवा करतांना प्रेम आणि आपुलकीचे नाते सदैव राहू दे. काही प्रसंगांमध्ये तुझे पतीशी तात्त्विक मतभेद झाले, तरी क्रोधित होऊन विपरित वर्तन करू नको. घरातील सेवक मंडळींशी अत्यधिक उदारभाव ठेव. त्यांचाशी सौजन्यपूर्ण व्यवहार कर. आपल्या उत्तम भाग्याचा (श्रीमंतीचा) अभिमान मनी बाळगू नकोस. अशा प्रकारे वर्तन ज्या स्त्रिया करतात, त्याच ‘गृहिणीपदा’ला योग्य ठरतात. एका वैदिक विद्वान ऋषींनी त्यांच्या मुलीला दिलेली ही कौटुंबिक दायित्वाची जाणीव आहे. आर्य सनातन वैदिक धर्माचे हेच वैशिष्ट्य आहे.
२. कितीही संकटे आली, तरी त्यातून दांपत्यजीवन सहजपणे तरून जाण्यासाठी कण्व ऋषींनी सांगितलेला उपदेश आचरणात आणणे आवश्यक !
प्रत्येक संस्काराला एक उपदेश आणि नैतिकता यांची जाणीव करून दिलेली आहे. हाच धागा पुढे पकडून आज ६ वे पद काय दायित्व देते, ते पाहूया.
मंत्र : ऋतुभ्यः षट्पदी भव ।
अर्थ : तू माझ्यासमवेत सहावे पाऊल टाक, तू मला सर्व ऋतूंमध्ये प्राप्त होणारे भोग देणारी हो. शब्दश: अर्थ फार सहज सोपा आहे; परंतु गुढार्थ गंभीर आहे. आपल्याकडे षड्ऋतु (६ ऋतु) हेे शास्त्रकारांनी सांगितले आहेत. ग्रीष्म, हेमंत, शिशिर, वसंत, शरद आणि वर्षा अशी त्यांची नावे आहेत. प्रत्येक ऋतूचे एक वैशिष्ट्य आहे.
अ. ग्रीष्म : हा ऋतू उन्हाचे चटके देतो.
आ. शरद : हा ऋतू चांदण्यांचा अनुभव देतो.
इ. वर्षा : हा ऋतू पावसाचा आनंद आणि सृष्टीत आल्हाद देतो.
ई. वसंत : हा ऋतू ‘बहर’ देतो.
उ. शिशिर : शिशिरात पानगळ होते.
या सर्व ऋतूंमध्ये निसर्गात परिवर्तन होत रहाते. आपले आयुष्यही तसेच आहे. कधीतरी ‘वसंताचा बहराचा काळ’ असतो. आपल्या आयुष्यात प्रगतीचा काळ असतो. काही वेळा शिशिरात पानगळही होते. ‘काही वेळा थोडी संकटे येतात, खडतर काळ आयुष्यात येतो. ‘ग्रीष्माचे चटके’ (परिस्थितीमुळेे) ही भोगावे लागतात. शरदाच्या चांदण्याची शीतलताही अनुभवता येते. थोडक्यात सांगायचे, तर आयुष्यात सुख-दु:ख, जय-पराजय, लाभ-हानी, चढ-उतार या सर्व घटना येत असतात. भरभरून संपत्ती येते, कधी तरी गरिबीही येते. तेव्हा माझ्या प्रिय सखी तू सर्व काळात समान बुद्धीने वाग. धन असतांना उन्मत्तपणाने मातू नको आणि गरिबी आली, तरी ‘गृहच्छिद्र उघडी करू नकोस.’’
आपण उभयता या सर्व ऋतूत परस्परांवर विश्वास ठेवून मार्गक्रमण करूया. पैसा भरपूर आहे; म्हणून प्रतिदिन ‘दिवाळी’ नको. तसेच पैसा नाही; म्हणून ‘शिमगा’ नको.
कण्व ऋषींनी हेच शकुंतलेला समजावले. हाच उपदेश आपल्या आयुष्यात आचरण केलात, तर कितीही संकटे येऊ देत. दांपत्यजीवन त्यातून सहज तरून जाईल.
‘धन’ या शब्दाची एक सोपी व्याख्या एका सुभाषितामध्ये केली आहे.
विदेशेषु धनं विद्या व्यसनेषु धनं मतिः ।
परलोके धनं धर्मः शीलं सर्वत्र वै धनम् ॥
अर्थ : विदेशात विद्या हेच धन असते, संकटात बुद्धी धनाप्रमाणे उपयोगी पडते. मृत्यूनंतर परलोकात (जिवंतपणी केलेले) धर्माचरण हे धन आहे, तर शील (चांगली वागणूक) सगळीकडेच उपयोगी पडते.
विदेशात ‘धन’ ही विद्या आहे. व्यसनात किंवा संकटात बुद्धी हेच धन. परलोकात ‘धर्माचरण’ हेच धन. शील मात्र सर्वत्र धनच आहे. तेव्हा माता भगिनींनो, आपण कितीही संकटे आली, तरी न घाबरता वरील उपदेश मनाशी जतन करावा. पैसा हेच ‘धन’ न जाणता विद्या, बुद्धी, धर्माचरण हेच धन मानून आचरण करावे. शील मात्र प्राणाहून जपावे. प्रलोभनांना बळी पडू नये. ही विनंती. असे झाले, तरच ‘ऋतुभ्य: षट्पदी भव ।’ हे सार्थकी होईल.’
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. (६.१२.२०२२)