वीटभट्टी कामगारांची समस्‍या !

वीटभट्टी कामगारांवर उपासमारीची वेळ !

‘वीटभट्टी हेच आपले जीवन’, असे मानून काही कुटुंबांचे संपूर्ण आयुष्‍यच वीटभट्टीवर मोलमजुरी करण्‍यात निघून जाते. पहाटे कामावर यायचे, दिवसभर पायानेच चिखल तुडवायचा, दिवसभर उन्‍हाचे चटके सोसत विटा थापायच्‍या आणि सायंकाळी मिळेल ती मजुरी घेऊन बाजारहाट करून घराकडे जायचे, हा ठरलेला दिनक्रम !

सातारा जिल्‍ह्यातील सर्वाधिक वीटभट्टी कामासाठी पाटण आणि कराड तालुक्‍याची ओळख प्रसिद्ध आहे. सध्‍या पाटण तालुक्‍यात माती वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्‍यामुळे गत ३ मासांपासून वीट व्‍यवसाय पूर्णपणे ठप्‍प झाला आहे. वीट व्‍यवसायावर अवलंबून असलेले सहस्रो कामगार बेरोजगार झाले असून त्‍यांच्‍यावर उपासमारीची वेळ आली आहे. अडचणीच्‍या काळात वीटभट्टी मालकाकडून आगाऊ रक्‍कम घेऊन काही कामगार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवत असत; मात्र वीटभट्टीचे काम पूर्णपणे बंद झाल्‍यामुळे ते पुन्‍हा केव्‍हा चालू होणार ? असा प्रश्‍न वीटभट्टी मालकांना पडला आहे. पाटण तालुका हा डोंगराळ आणि अतीदुर्गम भाग असून तालुक्‍यात रोजगाराची साधने अत्‍यल्‍प आहेत. तालुक्‍यात उद्योग, व्‍यवसाय यांची वानवा असल्‍यामुळे अनेक युवक उद्योग, व्‍यवसाय, नोकरी यांनिमित्त पुणे, मुंबई यांसारख्‍या शहरांची वाट धरत आहेत. उर्वरित कुटुंबीय हाताला मिळेल ते काम करून उदरनिर्वाह चालवत आहेत. वर्ष २०१४ पासून वीटभट्टी व्‍यवसायाला उतरती कळा लागली आहे. पाटण तालुक्‍यात अनुमाने ४ ते ५ सहस्र पुरुष आणि महिला कामगार वीटभट्टीवर कामास आहेत. प्रतिदिन पुरुषास ७५० ते ८०० रुपये, तर महिला कामगाराला ५५० ते ६०० रुपये वेतन मिळते. याप्रमाणे हिशोब केल्‍यास सध्‍या माती वाहतूक पूर्णत: बंद असल्‍यामुळे प्रतिदिन लाखो-कोटी रुपयांची उलाढाल असलेला वीटभट्टी व्‍यवसाय पूर्णपणे ठप्‍प झाला आहे.

काही संधीसाधू लोकांमुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याविषयी शासनस्‍तरावर अनेक वेळा वीटभट्टीचालक-मालक यांनी गार्‍हाणे मांडले आहे; मात्र याविषयी अद्याप कोणतीही नोंद घेण्‍यात आलेली नाही. वीटभट्टी व्‍यवसाय बंद पडल्‍यास बांधकामे बंद पडतील. त्‍यामुळे भविष्‍यात बांधकाम व्‍यवसायावरही गंभीर परिणाम होऊ शकतो. त्‍यामुळे अर्थचक्र फिरते रहाण्‍यासाठी या उद्योगाला राजाश्रय हवा, तरच वीटभट्टी कामगारांवर आलेली उपासमारीची वेळ टळून त्‍यांना मुबलक रोजगार उपलब्‍ध होईल, हे निश्‍चित !

– श्री. राहुल देवीदास कोल्‍हापुरे, सातारा