ब्रिटनने कोट्यवधी भारतियांना ठार मारून ४५ ट्रिलियन डॉलर्सची संपत्ती लुटून नेली !

ब्रिटनने युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रशियाकडून कठोर टीका !

मॉस्को (रशिया) – भारतावर राज्य करतांना ब्रिटनने ४५ ट्रिलियन डॉलर्सची साधनसंपत्ती भारतातून लुटून नेली. त्या बळावर ब्रिटन श्रीमंत बनले. वर्ष १८८० ते १९२० या कालावधीत भारतातील अनुमाने १०० कोटी जनता ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणांची बळी ठरली होती. हा काळ ब्रिटिशांच्या भारतावरील राजवटीचा सर्वोच्च बिंदू होता आणि याच काळात भारतीय जनतेला मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या, अशा कठोर शब्दांत रशियाने ब्रिटनवर टीका केली.

ब्रिटनने युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रशियाने ही टीका केली आहे. रशियाने भारताविषयी दिलेली आकडेवारी आर्थिक मानववैज्ञानिक जेसन हिकेल आणि डायलन सुलिवन यांच्या अभ्यासावर आधारित असल्याचे रशियाने नमूद केले आहे.

१. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसारित केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, भारतात १८८० च्या दशकात १ सहस्र व्यक्तींमागे ३७.२ इतका मृत्यूदर होता. तो १९१० च्या दशकात वाढून ४४.२ इतका झाला. या कालावधीत भारतियांचे आयुर्मान २६.७ वर्षांवरून घटून २१.९ वर्षे इतके झाले. वर्ष १९४३ च्या काळात तत्कालीन बंगालमध्ये लाखो भारतियांचा मृत्यू ब्रिटीश पुरस्कृत मानववंशजन्य दुष्काळापायी झाला. ती मानवीय आपत्ती ब्रिटिशांच्या तत्कालीन वसाहतवादी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांचा थेट परिणाम होती. त्याला तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे निर्णय मोठ्या प्रमाणात कारणीभूत होते. ब्रिटनच्या गरजा भागवण्यासाठी भारतातून मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा साठा नेण्याचा आदेश चर्चिल यांनी दिला होता. त्याचा परिणाम म्हणून अनुमाने ३० लाख भारतियांचा मृत्यू झाला.

२. रशियाने या निवेदनात ब्रिटनच्या वंशविद्वेषी धोरणाचा उल्लेख करतांना ‘विन्स्टन चर्चिल यांचे भारतियांविषयी नेमके काय मत होते ?’, याचाही पुराव्यानिशी उल्लेख केला आहे. ‘चर्चिल यांच्या वसाहतवादी धोरणांमुळेच भारतात मोठी मानवी आपत्ती आली होती’, असे नमूद करण्यात आले आहे.

३. ‘ब्रिटीश साम्राज्याने भारतातून अनुमाने ४५ ट्रिलियन डॉलरची संपत्ती लुटून नेली’, असा उल्लेखही रशियाने सुप्रसिद्ध भारतीय अर्थतज्ञ उत्सा पटनायक यांचा संदर्भ देऊन केला आहे.

संपादकीय भूमिका

ही संपत्ती मिळवण्यासाठी  आता सरकारने प्रयत्न केले पाहिजे !