केरळमधील इस्लामी शैक्षणिक संस्थेमध्ये हिंदु धर्मग्रंथ शिकवण्यात येणार !

त्रिशूर (केरळ) – जिल्ह्यामधील ‘मलिक दीनार इस्लामिक कॉम्प्लेक्स’मध्ये गेल्या ७ वर्षांपासून संस्कृतचे श्‍लोक शिकवण्यात येत होते. आता तेथे काही हिंदु ग्रंथांचाही समावेश करण्यात आला आहे. यात श्रीमद्भगवद्गीतेचा समावेश आहे.


विद्यार्थ्यांना दुसर्‍या धर्माविषयी जागरूकता आणण्याच्या उद्देशाने या प्राचीन भाषेमध्ये शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. हा नवा अभ्यासक्रम यावर्षी जून मासापासून नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

१. अकरावी आणि बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात संस्कृत व्याकरणासह  संस्कृत भाषेच्या अंतर्गत श्रीमद्भगवद्गीता आणि अन्य हिंदु धार्मिक ग्रंथ यांचा समावेश करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम संस्कृतचे श्री शंकराचार्य विद्यापिठातील संस्कृत साहित्याचे प्राध्यापक डॉ. सी.एम्. नीलाकंदन आणि केरळ विद्यापिठातील संस्कृत विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. शमीर पी.सी. यांनी संयुक्तरित्या सिद्ध केला आहे.

२. संस्थेत समन्वयक म्हणून कार्यरत असलेल्या हाफिज अबूबकर यांनी सांगितले की, यापूर्वी संस्कृतचा अभ्यासक्रम इतका सविस्तर नव्हता. ८ वर्षांचा नवा अभ्यासक्रम सिद्ध करण्यात आला असून तो ११ वीपासून पदव्युत्तर पदवीपर्यंत असेल. आता विद्यार्थी संस्कृत विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेऊ शकतात.