राज्‍य सरकारच्‍या अध्‍यादेशात हिंदी भाषेचा ‘राष्‍ट्रभाषा’ असा उल्लेख !

सामाजिक संकेतस्‍थळांवर तीव्र प्रतिक्रिया !

मुंबई – महाराष्‍ट्र राज्‍य हिंदी साहित्‍य अकादमीची फेररचना करण्‍यासाठी १६ जानेवारी या दिवशी शासनाचे उपसचिव विलास थोरात यांच्‍या डिजिटल स्‍वाक्षरीने लागू करण्‍यात आलेल्‍या अध्‍यादेशात ‘हिंदी ही राष्‍ट्रभाषा आहे’, असा उल्लेख करण्‍यात आला आहे. यावरून सामाजिक माध्‍यमांतून जोरदार टीका करण्‍यात येत आहे.

शासन निर्णयाच्‍या प्रस्‍तावनेतच ‘हिंदी ही राष्‍ट्रभाषा असल्‍यामुळे…’ असा प्रारंभ करण्‍यात आला आहे. ‘हिंदी ही कधीही राष्‍ट्रभाषा नव्‍हती आणि नाही. भारत सरकारने कोणत्‍याच एका भाषेला कधीच राष्‍ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. भारतात सर्वाधिक औपचारिक वापरामुळे हिंदी ही राष्‍ट्रभाषा असल्‍याचा समज असला, तरी तो केवळ समज आहे. याविषयी कोणताही अधिकृत दस्‍तावेज उपलब्‍ध नाही. हिंदी ही राष्‍ट्रभाषा नाही, हे महाराष्‍ट्र सरकारला ठाऊक नसावे’, अशी टीका सामाजिक माध्‍यमांतून करण्‍यात येत आहे.