शेतीवर बांध न घालणारे मंगळवेढावासिय !

‘मंगळवेढा’ शेतीला बांध नसणारे गाव !

महाराष्‍ट्र राज्‍यात सर्वाधिक वाद हे शेतीच्‍या बांधावरून होतात. या वादावरून अगदी ‘सख्‍खे भाऊ पक्‍के वैरी’ झाल्‍याच्‍या बातम्‍या नेहमीच आपल्‍या वाचनात किंवा पहाण्‍यात येतात. महसूल, पोलीस खाते आणि न्‍यायालयात येथेही सर्वाधिक वाद बांधावरून झाल्‍याचे दिसते; मात्र महाराष्‍ट्रात एक असे गाव आहे की, जिथे शेतीला बांधच नाही.तेथे शेतीला बांध न घालण्‍याची शेकडो वर्षांची अनोखी परंपरा आजही कायम आहे. सोलापूर जिल्‍ह्यातील मंगळवेढा शिवारात आजही जवळपास १ लाख एकर शेतीला बांध नाही.

दामाजी पंतांचे दुष्काळी मंगळवेढा जगभरात ज्वारीचं कोठार म्हणून फेमस झालंय ! (चित्रावर क्लिक करा)

एका बाजूला राज्‍यात लोकसंख्‍येनुसार शेतीच्‍या तुकड्यांची संख्‍या वाढत चालली आहे. असे होत असतांना बांधाचे वाद ही महाराष्‍ट्रासमोरची मोठी डोकेदुखी बनत चालली आहे. येथे शेतीच्‍या बांधावरून कधीच वाद होत नाहीत. हे शहर संत दामाजी महाराजांच्‍या पदस्‍पर्शाने पावन झालेले आणि संतपरंपरा असणारे शहर आहे. येथील शेतकर्‍यांनी कधीच ज्‍वारीचे बियाणे बाजारातून खरेदी केल्‍याचे ऐकिवात नाही. पिढ्यान्‌पिढ्या शेतात आलेल्‍या ज्‍वारीतून पुढच्‍या वर्षीच्‍या बियाण्‍यासाठी थोडी ज्‍वारी ठेवण्‍याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. त्‍यामुळेच की काय या परिसरात आजारी पडण्‍याचे प्रमाण अत्‍यल्‍प आहे. या भागात अतीदक्षता विभाग नाही. जर कुणी बांध केलाच, तर एखाद्या पावसात केलेले ते बांध मोडून जातात. हा पूर्वापार चालत आलेला अनुभव असल्‍याने या भागातील शेतकरी कधी बांध घालत नाहीत. बांधावर असलेले एखादे झुडूप, एखादी दगडाची खूण यावरून बांध नक्‍की होतात आणि यानंतर प्रत्‍येक शेतकरी आपल्‍या मालकीची भूमी लक्षात ठेवतो. याला शेजारचा शेतकरीही कधी आक्षेप घेत नाही किंवा वादविवाद करत नाही. वाटण्‍या झाल्‍या, तरी कासर्‍याने (बैलांच्‍या गळ्‍यात बांधण्‍याचा दोर) किंवा पावले टाकून भूमीची वाटणी करून ती कायमची असते. तरुण पिढीलाही ही भूमी वाटण्‍याची पद्धत मान्‍य असते.

याउलट जळगाव जिल्‍ह्यातील पळासखेडे येथे अशोक आणि विजय या शेतकर्‍यांत शेतरस्‍त्‍यावरून वाद होता. विजय पाटील याने अशोक पाटील या शेतकर्‍याची बैलगाडी अडवत शेतातून बैलगाडी नेण्‍यास विरोध केला. दोघांत वादावादी झाली. क्षणातच विजय पाटील याने पिस्‍तूल काढून अशोक पाटील यांच्‍यावर ३ गोळ्‍या झाडल्‍या होत्‍या. त्‍यामुळे अन्‍य गावाच्‍या शेतकर्‍यांनीही मंगळवेढा गावाचा आदर्श घेऊन मनाचे बांध तोडून शेतीच्‍या बांधावरून होणारे वाद रोखावेत !

– श्री. नीलेश पाटील, जळगाव