साधकांची साधना व्‍हावी, ही तळमळ असल्‍याने त्‍यांना क्षणोक्षणी घडवणारे आणि साधकांवर निरपेक्ष प्रीती करणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

डोंबिवली, जिल्‍हा ठाणे येथील साधक श्री. प्रकाश शिंदे वर्ष १९८९ पासून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या संपर्कात आहेत. आरंभी ते वैद्यकीय उपचार घेण्‍यासाठी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांकडे जायचे. त्‍यांना होणार्‍या वाईट शक्‍तीच्‍या त्रासासाठी परात्‍पर गुरु डॉक्‍टर नामजपादी उपाय सांगायचे. त्‍यानंतर श्री. प्रकाश शिंदे यांनी साधनेला आरंभ केला आणि ते मुंबई येथील सेवाकेंद्रात सेवा करायलाही जाऊ लागले. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या सत्‍संगातील आठवणी आणि मिळालेली शिकवण यांविषयीची त्‍यांनी दिलेली सूत्रे पुढे दिली आहेत.  (भाग १)

१. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची भेट

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१ अ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांकडे वैद्यकीय उपचार घेत असतांना त्‍यांनी वाईट शक्‍तीचा त्रास दूर होण्‍यासाठी साधकाला नामजपादी उपाय करायला सांगून त्‍याच्‍याकडून साधना करून घेणे : ‘वर्ष १९८९ मध्‍ये मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांकडे वैद्यकीय उपचार घेत होतो. त्‍या वेळी स्‍वयंसूचना देऊनही माझ्‍यात काही पालट होत नव्‍हते. परात्‍पर गुरु डॉक्‍टर प्रत्‍येक गुरुवारी अनेक रुग्‍णांना नामजपादी उपाय सांगायचे. एका गुरुवारी सगळे रुग्‍ण गेल्‍यानंतर त्‍यांनी मला त्‍यांच्‍या खोलीत बोलावले आणि मी रहात असलेल्‍या घराचे मानचित्र (नकाशा) काढायला सांगितले. त्‍यांनीही माझ्‍या घराचे मानचित्र काढले. आम्‍ही दोघांनी काढलेल्‍या मानचित्रांत १०० टक्‍के साम्‍य होते. यातून ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची सूक्ष्मातून जाणण्‍याची क्षमता अफाट आहे ’, हे मला समजले. ते मला म्‍हणाले, ‘‘तुला वाईट शक्‍ती त्रास देत असल्‍याने तुझी प्रकृती ठीक नसते. तू ज्‍या खोलीत रहातोस, तेथे ५ – ६ लिंगदेह आहेत. तुझा त्रास नाहीसा होण्‍यासाठी तू प्रतिदिन ९ माळा कालीमाता आणि ६ माळा कुलदेवी यांचा नामजप कर.’’ (त्‍या वेळी आम्‍ही घरी कुलाचार करत नव्‍हतो.) परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी प्रत्‍येक शनिवारी माझी नारळाने दृष्‍ट काढायला सांगितली आणि तो नारळ मारुतीच्‍या देवळात (वाढवायला) फोडायला सांगितला. (‘वाईट शक्‍तीचा त्रास असलेल्‍या व्‍यक्‍तीची नारळाने दृष्‍ट काढल्‍यावर त्‍या व्‍यक्‍तीतील त्रासदायक शक्‍ती नारळात खेचली जाते आणि तो नारळ मारुतीच्‍या देवळात (वाढवल्‍यावर) फोडल्‍यानंतर ती त्रासदायक शक्‍ती न्‍यून होते’, असे शास्‍त्र परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी सांगितले होते.) हे सर्व करायला सांगून परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी एक प्रकारे माझ्‍याकडून साधनेलाच आरंभ करून घेतला.

श्री. प्रकाश शिंदे

१ आ. जेजुरी येथील किल्ला पाहिल्‍यावर ‘लहानपणापासून स्‍वप्‍नात दिसत असलेला किल्ला हाच आहे’, असे जाणवून आनंदाची अनुभूती येणे आणि याविषयी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना सांगितल्‍यावर त्‍यांनी ‘तुझ्‍यात अष्‍टसात्त्विक भाव निर्माण होऊन तुला आनंदाची अनुभूती आली’, असे सांगणे : माझा जन्‍म रविवारचा आहे आणि हा वार श्री खंडोबाचा आहे. मला लहानपणापासून स्‍वप्‍नात एक किल्ला दिसायचा; परंतु ‘हा किल्ला कुठे आहे ?’, ते मला ठाऊक नव्‍हते. वर्ष १९८९ मध्‍ये मी जेजुरी येथे पहिल्‍यांदा गेलो होतो. तेथील किल्ला पाहिल्‍यावर माझ्‍या लक्षात आले, ‘मला स्‍वप्‍नात दिसत असलेला किल्ला हाच असून मी येथे कधीतरी येऊन गेलो आहे.’ तेव्‍हा मला आंतरिक समाधान मिळाले. श्री खंडोबाचे दर्शन घेतांना ‘हेच माझे माता-पिता आहेत’, असा भाव माझ्‍यात निर्माण होऊन माझ्‍या डोळ्‍यांतून अश्रू येऊ लागले. त्‍या वेळी मला आनंदाची अनुभूती आली. नंतर मी याविषयी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना सांगितल्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘तुझ्‍यात अष्‍टसात्त्विक भाव निर्माण होऊन तुला आनंदाची अनुभूती आली. फारच छान झाले !’’

१ इ. मुंबई येथील सेवाकेंद्रात जाऊन सेवा करू लागल्‍यावर प.पू. भक्‍तराज महाराज यांचे दर्शन घेण्‍याच्‍या निमित्ताने परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साधकाला घरी बोलावणे, दीड वर्षानंतर त्‍याला ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर याच माळ्‍यावर रहातात’, हे समजणे आणि ‘भाव निर्माण झाल्‍यावर कुटुंबातील एक समजून परात्‍पर गुरुदेव साधकांना घरी बोलावतात’, हे त्‍याच्‍या लक्षात येणे : वर्ष १९८९ मध्‍ये मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या अभ्‍यासवर्गांना जात होतो. सेवेनिमित्त माझे सेवाकेंद्रात जाणे-येणे व्‍हायचे. मी त्‍यांच्‍या चिकित्‍सालयात सेवा करत होतो. मी जवळ-जवळ दीड वर्ष त्‍यांच्‍याकडे नियमित जात होतो. त्‍यामुळे मला आनंदही मिळत होता. हा आनंद इतरांनाही मिळावा, यासाठी मी माझे नातेवाईक आणि मित्र यांनाही एकेक करून परात्‍पर गुरु डॉक्‍टरांकडे घेऊन जाऊ लागलो, जेणेकरून त्‍यांनाही परात्‍पर गुरु डॉक्‍टर काहीतरी साधना सांगतील अन् त्‍यांचे कल्‍याण होईल. माझ्‍या मनात परात्‍पर गुरु डॉक्‍टरांप्रती भाव निर्माण होत होता.

एकदा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी आम्‍हा साधकांना सांगितले, ‘‘उद्या प.पू. भक्‍तराज महाराज (प.पू. बाबा) येणार आहेत. तुम्‍ही त्‍यांच्‍या दर्शनासाठी येऊ शकता !’’ त्‍या वेळी त्‍यांनी त्‍याच माळ्‍यावर असलेल्‍या सदनिकेतील त्‍यांची खोली आम्‍हाला दाखवली. तेव्‍हा दीड वर्षानंतर मला समजले, ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर याच माळ्‍यावर रहातात.’ दुसर्‍या दिवशी सर्व साधकांना प.पू. बाबांचे दर्शन झाले आणि आम्‍ही सर्वांनी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे घर आतून पाहिले.

एक साधक ५ – ६ मासांपासून सेवेसाठी येत होते. एकदा परात्‍पर गुरु डॉक्‍टर आम्‍हाला म्‍हणाले, ‘‘आता नामजप आणि सेवा करून त्‍या नवीन साधकामध्‍ये भाव निर्माण झाला आहे. त्‍यांना ‘आपले घर याच माळ्‍यावर आहे’, ते सांगून दाखवू शकतो.’’ तेव्‍हा माझ्‍या लक्षात आले, ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर सरसकट सर्वांना घरी बोलावत नव्‍हते. साधकात सेवा करून भाव निर्माण झाल्‍यावरच ते त्‍याला त्‍यांचे घर दाखवत. एकदा साधकात भाव निर्माण झाला की, ते त्‍याला स्‍वतःच्‍या कुटुंबातीलच एक समजत.’ तेव्‍हा मला माझ्‍या मनातील ‘मी दीड वर्ष येथे असूनही त्‍यांनी मला त्‍यांचे घर का दाखवले नव्‍हते ?’ या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले.

२. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती आणि सर्वज्ञता !

२ अ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी पूर्णवेळ साधना करणारे साधक आणि त्‍यांचे कुटुंबीय यांना सणाच्‍या निमित्ताने नवीन कपडे अन् खाऊ देेणे : माझा लहान भाऊ श्री. दिनेश शिंदे, परात्‍पर गुरु डॉक्‍टरांजवळ राहून पूर्णवेळ साधना करू लागला. त्‍याला सेवेमुळे अनेक दिवस घरी येता यायचे नाही. सणाच्‍या वेळी तो आणि सत्‍यवानदादा (आताचे सद़्‍गुरु सत्‍यवान कदम) हे दोघे आमच्‍या घरी यायचे. तेव्‍हा त्‍यांच्‍यासमवेत परात्‍पर गुरु डॉक्‍टर आम्‍हा कुटुंबियांसाठी कपडे आणि खाऊ पाठवायचे. डॉ. (सौ.) कुंदाताई (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या पत्नी) आम्‍हाला दिवाळीच्‍या वेळी नवीन कपडे घ्‍यायच्‍या. त्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची साधक आणि त्‍यांचे कुटुंबीय यांच्‍यावर असलेली निरपेक्ष प्रीती अनुभवायला यायची.

२ आ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांंनी साधकाला त्‍याच्‍या भावी पत्नीविषयी सांगितल्‍यावर त्‍याला ताण येणे आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टरांंनी ‘मी आहे ना’, असे सांगून त्‍याला धीर देणे : एकदा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या समवेत दौर्‍यावर असतांना एका दुपारी आम्‍ही सर्व साधक एकत्र बसून चर्चा करत होतो. परात्‍पर गुरु डॉक्‍टर त्‍यांच्‍या खोलीत बसून ग्रंथाचे वाचन करत होते. ते अकस्‍मात् बाहेर आले आणि हसतच सर्व साधकांना माझ्‍या भावी पत्नीच्‍या स्‍वभावाविषयी सांगितले. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे बोलणे ऐकून ‘त्‍यांनी आता हे कशाला सांगितले ? मी इथे चांगल्‍या मनःस्‍थितीत होतो’, असे वाटून मला ताण आला. मी पूर्ण दिवस मी गप्‍पच होतो. त्‍या दिवशी पू. (कै.) भावेकाकांच्‍या घरी रात्रीचे जेवण होते. ते झाल्‍यावर आम्‍ही सर्व जण मुंबईला परत जायला निघालो. आमच्‍या समवेत चारचाकी गाडीत पू. भावेकाकाही होते. त्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी अकस्‍मात् विचारले, ‘‘प्रकाश बोलत का नाही ? त्‍याला काय झाले आहे ?’’ त्‍यावर पू. भावेकाका म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही त्‍याच्‍या लग्‍नाच्‍या संदर्भात सांगितले. त्‍यामुळे त्‍याला ताण आला आहे.’’ त्‍यांचे बोलणे ऐकून परात्‍पर गुरु डॉक्‍टर हसून मला धीर देत म्‍हणाले, ‘‘घाबरतोस काय ? मी तुझ्‍या समवेत आहे ना !’ त्‍यांचे बोलणे ऐकून माझी निराशा कुठल्‍या कुठे पळाली आणि माझा ताणही गेला.

यातून ‘गुरु साधकाला प्रारब्‍धाची जाणीव करून देतात आणि ते भोगण्‍याची क्षमताही निर्माण करतात’, हेे माझ्‍या लक्षात आले. माझे लग्‍न झाल्‍यानंतर २० – २१ वर्षांनी मागे वळून पाहिल्‍यावर ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने खडतर असलेल्‍या माझ्‍या प्रारब्‍धाची झळ मला कधीच जाणवली नाही’, हे माझ्‍या लक्षात आले. त्‍यांनी मायेतील जगात मला सांभाळून घेतले. त्‍यामुळे  त्‍यांच्‍या कृपेने मी आजही साधनेत टिकून आहे.

२ इ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साधकाला ‘पुढे तुला आईला सांभाळावे लागेल’, असे सांगणे, त्‍यानंतर १५ वर्षांनी आईला स्‍मृतीभ्रंश झाल्‍याने साधकाला ३ वर्षे तिची सेवा करावी लागणे आणि त्‍या वेळी गुरुदेवांच्‍या वाक्‍याचा त्‍याला उलगडा होणे : एकदा परात्‍पर गुरु डॉक्‍टर सेवाकेंद्रात खोलीतील दाराच्‍या बाहेर उभे होते. सूक्ष्मातील काही बघतांना दृष्‍टी जशी एका ठिकाणी एकाग्र होते, तशी त्‍यांची दृष्‍टी होती. त्‍यांनी हसत मला सांगितले, ‘‘तुला पुढे आईला सांभाळावे लागेल.’’ त्‍या वेळी ‘ते असे का बोलत आहेत ?’, हे मी विचारले नाही. ‘आईला सांभाळणे’, हे माझे कर्तव्‍यच आहे आणि ‘ते चांगलेच आहे’, असा विचार करून मी तो विषय सोडून दिला.

माझे लग्‍न झाल्‍यानंतर आई माझ्‍याकडे रहायला आली. त्‍यानंतर १५ वर्षांनी वृद्धापकाळामुळे तिच्‍या मेंदूच्‍या पेशी वेगाने मृत होऊ लागल्‍या. त्‍यामुळे तिला स्‍मृतीभ्रंश झाला. तिला स्‍वतःचीही जाणीव रहायची नाही आणि ती घरच्‍यांनाही ओळखेनाशी झाली. ती एकटीच घराबाहेर गेली आणि घरी परत येण्‍याचा मार्ग विसरल्‍यामुळे ३ वेळा हरवली. तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी सांगितले, ‘‘आईला आश्रमातच घेऊन ये, म्‍हणजे ती हरवण्‍याची काळजी रहाणार नाही.’’ परात्‍पर गुरु डॉॅक्‍टरांनी माझ्‍याकडून ३ वर्षे रुग्‍णाईत आईची (कै. (श्रीमती) हौसाबाई शिंदे, आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के) सेवा करवून घेतली आणि तिची आध्‍यात्‍मिक प्रगती करवून घेऊन जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून सुटकाही केली. तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी १५ वर्षांपूर्वी सांगितलेल्‍या ‘तुला आईला सांभाळावे लागेल’, या वाक्‍याचा मला उलगडा झाला.

– श्री. प्रकाश शिंदे (वय ६० वर्षे), डोंबिवली, जिल्‍हा ठाणे, महाराष्‍ट्र. (६.९.२०२०) (क्रमशः)

भाग २ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/646538.html

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक