गुलाबी थंडीत आरोग्‍य चांगले कसे राखावे ?

‘थंडी गुलाबी असो कि बोचरी, तिचा मनमुराद आनंद उपभोगायचा असेल, तर ऋतूनुसार दिनचर्या पाळणे आवश्‍यक असते. थंड आणि कोरडी हवा शरिरावर विशिष्‍ट  परिणाम घडवून आणते. या ऋतूचे दुष्‍परिणाम टाळण्‍यासाठी आहार-विहारात थोडे पालट करणे महत्त्वाचे आहे. हिवाळ्‍यातील गारवा शरिरातील तापमानात पालट, तर घडवतो; पण त्‍यासमवेतच शरिरातील रूक्षता आणि कोरडेपणाही वाढतो. या काळात तहान लागण्‍याचे प्रमाण अल्‍प होते. मांसपेशी आणि सांध्‍याची शिथिलता अल्‍प होते, नसांचे तडतडणे वाढते, नाक-कान-घसा यांच्‍या आजारपणाचे प्रमाण वाढते. त्‍वचा, डोळे आणि केस यांचे आरोग्‍य बिघडते. या सगळ्‍या तक्रारी टाळण्‍यासाठी किंवा त्‍यांची तीव्रता अल्‍प करण्‍यासाठी विशिष्‍ट काळजी घेतल्‍यास हिवाळा उबदार होऊ शकतो.

डॉ. संजीवनी राजवाडे

१. आहारातील पालट

अ. स्‍पर्शाने थंड असणारे (बर्फ, आईस्‍क्रीम) आणि गुणाने थंड असणारे (ज्‍वारी, चंदन इत्‍यादी) पदार्थ शक्‍यतो टाळावेत. उष्‍णधर्मी सुंठ, मिरे, आले, लसूण, मेथी, बाजरी, लवंग इत्‍यादी पदार्थांचा आहारात विशेषत्‍वाने समावेश करावा. अन्‍नपदार्थ शक्‍यतो उष्‍ण असतांना खावेत. शरिरातील पाण्‍याची पातळी योग्‍य रहाण्‍यासाठी विविध द्रवपदार्थ घ्‍यावेत. यामध्‍ये सूप, सार, कडधान्‍याचे कढण आणि ताकाची कढी असे पदार्थ गरम गरम आलटून पालटून प्‍यावे. चिमूटभर सुंठ आणि हळद घालून उष्‍ण पाणी प्‍यावे. थंडीमध्‍ये त्‍वचेमध्‍ये पुरेसा ओलावा राखण्‍यासाठी पाण्‍याची पातळी योग्‍य राखणे आवश्‍यक आहे.

आ. शरिरात निर्माण झालेली रूक्षता अल्‍प होण्‍यासाठी अंतर्गत स्नेहनाची आवश्‍यकता असते. या ऋतूत साजूक तुपाचा वापर वाढवावा. पचनशक्‍ती उत्तम असल्‍याने हिवाळ्‍यात तुपात सिद्ध केलेले जड पदार्थ पचण्‍यास सोपे असतात. गोड पदार्थार्ंमध्‍ये आवर्जून सुंठ, वेलची, जायफळ आणि लवंग पूड घालावी. मधुमेहींनी तुपावर परतलेला कांदा पदार्थांत वापरावा. जेवणापूर्वी छोटा चमचाभर शुद्ध खोबरेल तेल पोटात घेणे उत्तम !

इ. मांसपेशीची शिथिलता आणि शारीरिक हालचाल यांची सुकरता यावी, या दृष्‍टीने  पुढील पदार्थांची चटणी करून आहारात घ्‍यावी. सुके खोबरे, तीळ आणि शेंगदाणे समप्रमाणात घ्‍यावेत. तीन पट कढीपत्ता घ्‍यावा. चवीनुसार लसूण, जिरे, तिखट, मीठ घालून पदार्थ भाजून चटणी करावी. ही चटणी कोरडी असून हवाबंद डब्‍यात १५ ते २० दिवस सहज टिकते.

ई. मेथीच्‍या दाण्‍यांना मोड आणून ही मेथी डाळी, उसळ, सॅलेड इत्‍यादी पदार्थार्ंमध्‍ये प्रतिदिन वापरावी. त्‍यामुळे पदार्थाची चव कडवट होत नाही. तसेच ही मोड आलेली मेथी शीतकपाटात (फ्रीजमध्‍ये) हवाबंद डब्‍यात आठवडाभर साठवता येते. यामध्‍ये सूजनाशक आणि जंतूविरोधी तत्त्वे असतात, तसेच ‘ब’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते. त्‍यामुळे छोटी दुखणी आणि जंतूसंसर्ग यांपासून दूर रहाता येते. जड अन्‍न पचवण्‍याची शक्‍तीही यांमध्‍ये आहे. हिवाळ्‍यात आवळा अतिशय उत्तम आणि मोठ्या प्रमाणावर मिळतो. ‘अँटीऑक्‍सिडेंट’ आणि रोगप्रतिकारक शक्‍ती वाढवण्‍यासाठी याचा नियमित वापर करावा. आवळ्‍याच्‍या कोणत्‍याही पदार्थाचा आहारात समावेश करावा.

उ. रंगीत भाज्‍या आणि फळे त्‍वचेसाठी हितकारक आहेत. त्‍वचा, स्निग्‍ध, ओलसर आणि चमकदार रहावी, अशा भाज्‍या अन् फळे मुबलक प्रमाणात वापरावीत. त्‍यामुळे डोळ्‍यांचा कोरडेपणाही अल्‍प होण्‍यास साहाय्‍य होते. आले, गवती चहा, लवंग आणि दालचिनी यांचा काढा गूळ घालून घ्‍यावा. त्‍यामुळे नाक, कान आणि घसा यांना सर्दीमुळे होणारा त्रास अल्‍प होण्‍यास साहाय्‍य होते.

२. विविध प्रकारचे तेल आणि कापूर यांचा वापर आवश्‍यक !

]रात्री झोपतांना नाकामध्‍ये तिळाचे किंवा खोबरेल तेल यांंचे २-३ थेंब सोडावेत. संपूर्ण शरिराला खोबरेल तेलाने अभ्‍यंग करावे. अंघोळीपूर्वी ५ मिनिटे हलक्‍या हाताने तेल लावावे. चोळून मालीश करणे अपेक्षित नाही. आठवड्यातून दोनदा तरी केसांना कोमट तीळ किंवा एरंडेल तेलाने मालीश करणे आवश्‍यक आहे. यांमुळे केस आणि डोक्‍याची त्‍वचा मुलायम रहाते. कोरडेपणामुळे निर्माण होणारा कोंडा अल्‍प होतो. डोक्‍याला येणारी खाजही अल्‍प होते. ओवा आणि भीमसेनी कापूर दोनास एक प्रमाणात रुमालात घालून लहानशी पुरचुंडी करून नेहमी जवळ ठेवावा. प्रवास करणार्‍यांनी प्रवासानंतर त्‍याचा सुवास दीर्घ श्‍वसनाने आत ओढून घ्‍यावा. इतरांना पुष्‍कळ शिंका आल्‍यास किंवा सर्दी झाल्‍यास याचा प्रयोग वारंवार करावा. हा ओवा आणि कापूर प्रतिदिन पालटावा.

३. व्‍यायाम करा ! 

हिवाळ्‍यात भूक वाढलेली असते आणि पचनशक्‍ती चांगली असते. त्‍यामुळे व्‍यायामाची क्षमताही वाढते. शारीरिक तंदुरुस्‍तीच्‍या दृष्‍टीने व्‍यायामही वाढवणे अपेक्षित आहे. सकाळी चालायला किंवा फिरायला जाणार्‍या ज्‍येष्‍ठांनी मात्र थोडे ऊन आल्‍यावर चालायला जाणे अधिक श्रेयस्‍कर आहे. व्‍यायामाची गती आणि व्‍यायामाचा कालावधी वाढवणे या ऋतूत अधिक लाभदायक ठरते.’

– डॉ. संजीवनी राजवाडे

(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’, २२.१२.२०२१)