शिधा आणि शस्त्रे यांच्याविना उणे २५ डिग्री तापमानात लढणे अशक्य !

रशियाच्या सैनिकांची पुतिन यांना व्हिडिओद्वारे विनंती !

रशियाचे राष्ट्रपती व्लादीमिर पुतिन (डावीकडे)

मॉस्को (रशिया) – रशियातील काही सैनिकांनी राष्ट्रपती व्लादीमिर पुतिन यांच्या नावाने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात ते म्हणत आहेत की, शत्रूच्या विरोधात आम्ही लढण्यासाठी धोकादायक अशा थंडीचा सामना करत आहोत. उणे २५ डिग्री सेल्सियसमध्ये पुरेसा शिधा आणि शस्त्रे नसतांना लढणे पूर्णपणे अशक्य आहे. आम्ही लढाईपूर्वीच बर्फामध्ये गारठून जाऊ.

१. अधिकार्‍यांनी सैनिकांना पुरेसा शिधा आणि शस्त्रे मिळत नसल्याच्या गोष्टीला दुजोरा दिला आहे. यामुळे सैनिकांचे मनोबळ खचू लागले आहे. त्यामुळेच ते अशा प्रकारे व्हिडिओ बनवून थेट राष्ट्रपती पुतिन यांना त्यांच्या अडचणी सांगत आहेत.

२. रशियन सैनिकांनी त्यांच्या व्हिडिओत असेही म्हटले की, आमचे नेतृत्व आम्हाला धमकावत असतो. अशा वातावरणात लढणे कठीण होईल. स्थिती सुधारण्याची आवश्यकता आहे. आमचा कमांडर आमची अडचण समजून घेण्यास सिद्धच नाही. जेव्हा आम्ही त्याला शिधा आणि शस्त्रे उपलब्ध करण्याविषयी सांगतो, तेव्हा तो हात वर करतो आणि ‘आहे त्यातूनच काम चालवावे लागेल’, असे सांगतो. अशामुळे शत्रूशी लढण्यापूर्वीच आमची तुकडी येथेच नष्ट होऊन जाईल.

आम्हाला वरिष्ठांच्या आदेशांकडे दुर्लक्ष करावे लागेल ! – सैनिकांची चेतावणी

एका सैनिकाने म्हटले की, आमच्या समवेतच्या सर्व सैनिकांना आमच्या वरिष्ठांच्या आदेशांकडे दुर्लक्ष करावे लागेल. आवश्यक साहित्य मिळाल्यावरच आम्ही पुढे वाटचाल करू शकू. आमच्याकडे वेळ फार अल्प आहे. आमच्यासाठी तुम्हीच (पुतिन) एकमेव आशा आहात.