‘बिअर बार’ बंद करून दोषींवर कारवाई करण्याची श्री मार्तंड देवस्थानाची मागणी !
जेजुरी (जिल्हा पुणे) – येथे महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या खंडोबा देवाचे मंदिर आहे. या मंदिराच्या देखभालीसाठी उत्पन्न मिळावे; म्हणून आतापर्यंत देवस्थानाला २५० हून अधिक एकर भूमी दान स्वरूपात मिळाली आहे. रोजमारा (प्रसादरूपी धान्य) वाटप आणि पूजाअर्चा करण्यासाठी उत्पन्न मिळावे, यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी मंदिराला भूमी दान केली होती. ही जागा आध्यात्मिक हेतूने दिली होती. या जागेच्या उत्पन्नातून प्रसाद आणि देवस्थानाच्या देखभालीचा व्यय भागवण्यात यावा, हा महाराजांचा उदात्त हेतू होता; मात्र मंदिराची देखभाल करणार्यांनी या पवित्र जागेवर चक्क ‘बिअर बार’ उघडला आहे. त्यामुळे हा बिअर बार त्वरित बंद करण्यात यावा आणि दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट’च्या माजी विश्वस्त नंदा राऊत आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र कदम यांनी केली आहे. (उत्तरप्रदेशातील सर्व तीर्थक्षेत्रांच्या परिसरात मद्य आणि मांस यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. असा निर्णय राज्यातही घ्यावा ! – संपादक )
१. याच भूमीमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी दर्शनाला येणार्या भाविकांसाठी ‘मल्हारतीर्थ’ या नावाने पवित्र कुंड उभारले आहे. या कुंडाशेजारी ‘लक्ष्मीतीर्थ’ नावाचे कुंडही आहे. या ऐतिहासिक कुंडात स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. महाराजांनी दिलेल्या जागेवर आजही ऐतिहासिक पवित्र कुंड आहे.
२. पेशव्यांनी या कुंडातील पवित्र पाणी शेताला दिले होते. त्यातून उत्पन्न होणारे धान्य हे भाविकांना ‘रोजमारा’ (प्रसादरूपी धान्य) म्हणून वाटण्यात येते. ‘हे धान्य घरोघरी गेल्यामुळे भाविकांच्या घरी लक्ष्मी नांदते’, अशी आख्यायिका आहे.
३. आज याच पवित्र कुंडाच्या शेजारी हा ‘बिअर बार’ उघडण्यात आला आहे. देवस्थानाच्या जागेवरील या बिअर बारमुळे दिवसभर येथे मद्यपी मद्य पित असतात. त्यामुळे देवस्थान आणि पवित्र कुंडाचे पावित्र्य नष्ट होत आहे. देवस्थानाची विटंबना होत आहे. तसेच देवस्थानाला छत्रपतींनी दिलेल्या जागेचा हा अपवापर आहे.
संपादकीय भूमिका‘बिअर बार’ बंद करण्याची मागणी का करावी लागते ? मंदिराच्या जागेवर ‘बिअर बार’ चालू करून धार्मिक स्थळांचे पावित्र्य भंग करणार्यांवर कठोर कारवाई करायला हवी ! हिंदूंनो, देवस्थानांचे पावित्र्य टिकवण्यासाठी संघटित होऊन वैध मार्गाने आवाज उठवा ! |