उत्तरप्रदेशच्या नेपाळला लागून असलेल्या सीमेवर मोठ्या प्रमाणात अवैध मदरसे !

  • उत्तरप्रदेश सरकारकडून चौकशीचा आदेश !

  • मदरशांना मिळणार्‍या अर्थपुरवठ्याची चौकशी होणार !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशला लागून असलेल्या नेपाळच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात अवैध मदरसे बांधले जात असल्याचे समोर आले आहे. यावर उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने याच्या चौकशीचा आदेश दिला आहे. सरकारने सीमेवरील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना या अवैध मदरशांना मिळणार्‍या अर्थपुरवठ्याची चौकशी करण्यासह ज्या संस्थांकडून हे मदरसे चालवले जात आहेत, त्यांना कुठून निधी मिळत आहे ?, याची माहितीही घेण्यास सांगितले आहे. सरकारने यापूर्वीच राज्यातील मदरशांचे सर्वेक्षण केले होते.

राज्याचे मंत्री धर्मपाल सिंह यांनी सांगितले की, मदरशांच्या सर्वेक्षरातून लक्षात आले की, या भागामधील मुसलमान गरीब आहेत. ते निधी देऊ शकत नाहीत. तरीही येथे मदरसे कसे चालू आहेत ? त्यांना कोण निधी देत आहे ?, हे आम्ही पहाणार आहोत. या मदरशांनी सर्वेक्षणात निधी देणार्‍यांची माहिती दिली नव्हती. असे अनेक मदरसे आहेत, ज्यांना बाहेरून निधी मिळत आहे. बाहेरून निधी का दिले जातो ? याची चौकशी आम्ही करणार आहोत. आमच्या राज्यातील मुलांचा वाईट कामासाठी वापर होण्याची शक्यता असल्याने आम्ही सतर्क आहोत.

संपादकीय भूमिका

अवैधरित्या मदरसे उभे रहात असतांना सरकारी यंत्रणा, पोलीस आणि गुप्तचर विभाग झोपले होते का ?