काँग्रेसचा ब्राह्मणद्वेष !

स्‍वातंत्र्यपूर्व काळापासून सातारा जिल्‍हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. शिवकाळातही क्रांतीची ठिणगी पेटली ती सातारा जिल्‍ह्यातून. ब्रिटिशांच्‍या काळात पत्री (प्रति) सरकार स्‍थापन होऊन त्‍याची कार्यवाही झाली ती सातारा जिल्‍ह्यातूनच ! अशा या क्रांतीअग्रणी सातारा जिल्‍ह्यात आजही बारा बलुतेदार आणि अठरापगड जाती गुण्‍यागोविंदाने नांदत आहेत; मात्र स्‍वातंत्र्यानंतरही तत्‍कालीन शासनकर्ते सत्ताप्राप्‍तीसाठी इंग्रजांची ‘फोडा आणि राज्‍य करा’, ही नीती अवलंबत आले आहेत. जाती-जातींमध्‍ये भांडणे लावणे, आरक्षणासाठी विशिष्‍ट समुदायांना एकमेकांविरुद्ध भडकवून देणे, असे प्रकार करत आहेत. महाराष्‍ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सातारा नगरपालिका प्रशासनाकडे दिलेल्‍या निवेदनामुळे याचेच प्रत्‍यंतर सातारावासियांना घडून आले.

निवेदनात म्‍हटले आहे की, स्‍वातंत्र्यपूर्व काळात वर्ष १८१८ मध्‍ये बाळाजी पंत नातू यांनी पुणे येथील शनिवारवाड्यावर स्‍वतःची पगडी उतरवून युनियन जॅक (ब्रिटिशांचा झेंडा) फडकावला होता. नंतर त्‍यांनी कटकारस्‍थान करून सातारा येथील प्रतापसिंह महाराज यांना पकडून देण्‍यासाठी ब्रिटिशांना साहाय्‍य करत स्‍वराज्‍य खालसा करण्‍यासाठी प्रयत्न केले होते. अशा बाळाजी यांना त्‍यांची जागा दाखवण्‍यासाठी सातारा नगरपालिकेच्‍या वतीने शिवतीर्थावर बांधण्‍यात आलेल्‍या सार्वजनिक स्‍वच्‍छतागृहाला ‘बाळाजी पंत नातू’ यांचे नाव देण्‍यात यावे. १८ जानेवारी या दिवशी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची जयंती आहे. तत्‍पूर्वी कार्यवाही न झाल्‍यास ‘आम्‍ही नामकरण करू’, अशी चेतावणी महाराष्‍ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे. सातारा ही स्‍वराज्‍याची शेवटची राजधानी ठरली; मात्र २०० वर्षांपूर्वीच्‍या घटनेची खपली काढून काँग्रेस पुन्‍हा जातीय तेढ निर्माण का करत आहे ? असा प्रश्‍न उठतो. हिंदवी स्‍वराज्‍याच्‍या निर्मितीसाठी सर्वच ज्ञातीबांधवांनी बलीदान दिले. त्‍यात ब्राह्मण समाजही अग्रभागी होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या अष्‍टप्रधान मंडळातही अनेक मंत्री ब्राह्मण होते. नंतरच्‍या काळात पेशव्‍यांनीही अनेक ब्राह्मण सरदारांना हाताशी घेऊन अटकेपार स्‍वराज्‍य स्‍थापन केले. ब्रिटीश भारतात आल्‍यानंतर देशाला स्‍वातंत्र्य मिळवून देण्‍यासाठी वासुदेव बळवंत फडके, टिळक, आगरकर, सावरकर आदींनी योगदान दिले; मात्र ब्राह्मणद्वेषाचा चष्‍मा घालून इतिहासात चुका केल्‍या म्‍हणून आता ब्राह्मणांना लक्ष्य करण्‍याचा उद्योग काँग्रेसने बंद करायला हवा, असेच सर्वांना वाटते.

– श्री. राहुल देवीदास कोल्‍हापुरे, सातारा