वक्‍फ प्राधिकरणाचे कामकाज संकेतस्‍थळावर येण्‍यासाठी केंद्रशासनाला विनंती करणार ! – सैयद शहेजादी, राष्‍ट्रीय अल्‍पसंख्‍यांक आयोग

केंद्रीय अल्‍पसंख्‍यांक आयोगाच्‍या सदस्‍या सैयद शहेजादी

मुंबई, ११ जानेवारी (वार्ता.) – वक्‍फ मंडळ हे अल्‍पसंख्‍यांक समाजाच्‍या विकासासाठी आहे. त्‍यामुळे वक्‍फ प्राधिकरणाचे कामकाज ‘ऑनलाईन’ होणे, ही चांगली गोष्‍ट आहे. वक्‍फ प्राधिकरण त्‍यांच्‍या उद्देशापासून हटले, तर त्‍याला काही अर्थ नाही. नागरिकांकडून मागणी आल्‍यास वक्‍फ प्राधिकरणाचे कामकाज ऑनलाईन व्‍हावे, यासाठी केंद्रशासनाकडे मी मागणी करीन, असे आश्‍वासन केंद्रीय अल्‍पसंख्‍यांक आयोगाच्‍या सदस्‍या सैयद शहेजादी यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या प्रतिनिधीच्‍या प्रश्‍नावर दिले. सैयद शहेजादी मागील ३ दिवसांपासून महाराष्‍ट्र दौर्‍यावर आल्‍या होत्‍या. ११ जानेवारी या दिवशी सह्याद्री अतिथीगृहात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत त्‍या बोलत होत्‍या.

या वेळी त्‍यांनी वक्‍फ मंडळ, अल्‍पसंख्‍यांक विकास मंडळ, तसेच विविध अल्‍पसंख्‍यांक समाजातील प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. राज्‍यपाल भगतसिंह कोश्‍यारी, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली. पत्रकार परिषदेत सैयद शहेजादी म्‍हणाल्‍या, ‘‘वर्ष २०११ च्‍या जनगणनेनुसार महाराष्‍ट्रात अल्‍पसंख्‍यांकांची लोकसंख्‍या २ कोटी २४ लाख इतकी आहे. एकूण लोकसंख्‍येच्‍या तुलनेत हे प्रमाण १९.३९ टक्‍के इतके आहे. राज्‍यात एकूण ६ सहस्र १५४ मशिदी आणि १ सहस्र ६४७ मदरसे आहेत. राज्‍यातील अनेक मशिदींची नोंदणी झालेली नाही. ही नोंदणी पूर्ण करण्‍याची सूचना वक्‍फ मंडळाला देण्‍यात आली आहे. वक्‍फ मंडळाची एकूण मालमत्ता १३ सहस्र ६१७ इतकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या कार्यकाळात अल्‍पसंख्‍यांक समाजासाठीच्‍या सर्वाधिक निधी देण्‍यात आला. अल्‍पसंख्‍यांक समाजासाठीच्‍या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोचवण्‍याचा केंद्रशासनाचा उद्देश आहे. अल्‍पसंख्‍यांक विकास विभागाच्‍या योजना राबवण्‍यासाठी कोणत्‍याही राज्‍यात स्‍वतंत्र अधिकारी नाही. महाराष्‍ट्रात स्‍वतंत्र अधिकारी नियुक्‍त करण्‍यासाठी मी केंद्रशासनाला विनंती करणार आहे. जैन समाजाच्‍या काही तक्रारींवर पोलीस अधिकार्‍यांनी कारवाई केलेली नाही, अशी तक्रार त्‍या समाजाकडून करण्‍यात आली आहे. याविषयी पोलीस महासंचालकांकडे येत्‍या १५ दिवसांत अहवाल देण्‍याचा आदेश देण्‍यात आला आहे.

लव्‍ह जिहादविषयी बोलणे टाळले !

या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या प्रतिनिधीने सैयद शहेजादी यांना लव्‍ह जिहादच्‍या वाढत्‍या घटनांविषयी विचारले असता त्‍यांनी ‘नो कॉमेंट्‍स’ म्‍हणत बोलण्‍यास नकार दिला.