मोपा ते बाणावली अंतरासाठी ‘गोवा टॅक्सी ॲप’ने आकारलेला दर अधिसूचित दराप्रमाणेच ! – पर्यटनमंत्री खंवटे

पर्यटनमंत्री रोहन खंवटे

पणजी, ८ जानेवारी (वार्ता.) – ‘गोवा टॅक्सी ॲप’द्वारे मोपा ते बाणावली या अंतरासाठी एका प्रवाशाला ४ सहस्र रुपये आकारले गेल्याची चर्चा सामाजिक माध्यमांवर चालू आहे. ‘गोवा टॅक्सी ॲप’ने ६५.८६ किलोमीटर अंतरासाठी ४ सहस्र १४८ रुपये आकारल्याचे यात म्हटले आहे. हे शुल्क विमानभाड्यापेक्षाही अधिक असल्याची टीकाही झाली.

या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, ‘‘गोवा टॅक्सी ॲप’द्वारे मोपा ते बाणावली या अंतरासाठी संबंधित प्रवाशाला आकारलेला दर हे वाहतूक खात्याने अधिसूचित केलेल्या दरानुसार आहे. याला कुणाचा आक्षेप असल्यास त्यावर चर्चा करता येईल.

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प चालू होऊन ३ दिवसच उलटल्याने अशा समस्या उद्भवू शकतात; मात्र यावर फेरविचार करून समस्या सोडवता येईल. अशी देयके सामाजिक माध्यमात फिरवल्याने यावर तोडगा निघू शकत नाही.’’