|
नागपूर – येथील महापालिकेतील महिला कर्मचार्यांकडे टक लावून पाहिल्याची तक्रार आल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका सेवेतील महिला कर्मचार्यांना कामाच्या ठिकाणी होणार्या लैंगिक छळवणुकीपासून संरक्षण देण्यासाठी येथील महानगरपालिकेत ‘महिला तक्रार निवारण समिती’ स्थापन करण्यात आली आहे. महापालिकेचे सर्वच विभाग आणि कार्यालये येथे फलक लावण्यात येणार आहेत. समितीच्या अध्यक्षपदी धरमपेठ झोन क्रमांक २ येथील विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे यांची नियुक्ती करण्यात आली असून सचिवपदी अलका गावंडे आहेत. हा निर्णय महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन् बी. यांनी घेतला आहे.
१. आयुक्त राधाकृष्णन् बी., अतिरिक्त आयुक्त डॉ. राम जोशी, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, डॉ. भावना सोनकुसळे आणि अलका गावंडे यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या मुख्य इमारतीत महापालिका महिला तक्रार निवारण समिती फलकाचे अनावरण करण्यात आले.
२. ‘महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांत, तसेच महापालिकेच्या विविध विभागांत समितीचे फलक लावून महिलांना समितीविषयी माहिती देण्यात यावी’, अशा सूचना या वेळी आयुक्त राधाकृष्णन् बी यांनी केल्या.
३. महापालिकेच्या अंतर्गत काम करणार्या महिला कर्मचार्यांनी कुठल्याही प्रकारचा त्रास असल्यास समितीच्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. सोनकुसळे यांनी केले.
४. समितीकडे येणार्या पीडित व्यक्तींच्या संरक्षणाची आणि गुप्तता यांची काळजी घेतली जाईल. चौकशीनंतर आरोपी व्यक्ती दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, यात निलंबनाची कारवाई होऊ शकते. कामाच्या ठिकाणी पुरुष सहकार्याकडून अथवा प्रमुख यांच्याकडून लैंगिक छळ होत असल्यास महिलांनी त्वरित तक्रार प्रविष्ट करावी, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
पुढील विषयांच्या संदर्भात करता येणार तक्रार !
लैंगिकता सूचक शारीरिक स्पर्श, अश्लील दूरभाष, अश्लील बोलणे, लैंगिकता सूचक शेरे मारणे, अश्लील विनोद सांगणे, टक लावून पहाणे, अनावश्यक व्यय, चुकून शरिराच्या विशिष्ट अवयवांना स्पर्श करणे, घसटणे, अतीजवळ येणे, अश्लील वा धमकीची पत्रे पाठवणे, कार्यालय, स्नानगृह, उद़्वाहनाच्या (लिफ्टच्या) भिंतीवर लिखाण किंवा चित्र लावणे इत्यादींविषयी तक्रारी असल्यास महिला कर्मचार्यांनी डॉ. भावना सोनकुसळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने महिला कर्मचार्यांना केले आहे.
संपादकीय भूमिकामहिला तक्रार निवारण समिती राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांत स्थापन केली पाहिजे ! |