सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत कसे रहायचे ?’, याविषयी केलेले मार्गदर्शन !

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१. सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन

१ अ. सजीव आणि निर्जीव वस्‍तूंकडूनही शिकले पाहिजे ! : ‘एकदा सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे मला म्‍हणाले, ‘‘सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत रहाण्‍यासाठी प्रथम आपली दृष्‍टी तशी बनवणे आवश्‍यक आहे. जसे श्री दत्तगुरूंनी २४ गुणगुरु केले होते, तसे आपणही प्रत्‍येक सजीव आणि निर्जीव वस्‍तूकडून शिकले पाहिजे, उदा. पंखा, वारा इत्‍यादी.

१ आ. अंतर्मुख रहा ! : कृतीच्‍या स्‍तरावर प्रयत्न करण्‍यासाठी मध्‍ये मध्‍ये ‘आतापर्यंत झालेल्‍या घटनांमधून आपण काय शिकलो ?’, असे स्‍वतःला विचारत रहाणे आवश्‍यक आहे.

कु. श्रद्धा लोंढे
कु. श्रद्धा लोंढे

१ इ. शिकण्‍यातील प्राधान्‍य ठरवायला हवे ! : साधकाने ‘मला प्राधान्‍याने काय शिकायचे आहे ?’, याचा अभ्‍यास करायला हवा, अन्‍यथा अनावश्‍यक गोष्‍टी शिकण्‍यात वेळ जाऊ शकतो, उदा. साधकाने ‘साधनेच्‍या दृष्‍टीने किंवा सेवेच्‍या दृष्‍टीने काय शिकणे आवश्‍यक आहे ? काय शिकले, तर साधना करण्‍यास साहाय्‍य होईल ?’, याचा विचार करून प्राधान्‍याने ते शिकायला हवे. आपल्‍याला जी सेवा दिली आहे, तिच्‍यातील बारकावे शिकण्‍याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.

१ ई. स्‍वभावदोष-निर्मूलन आणि गुणसंवर्धन करण्‍यास प्राधान्‍य द्यायला हवे ! : सेवा करतांना ‘आपले कोणते स्‍वभावदोष प्रकट होत आहेत ?’, याचा अभ्‍यास करून ते न्‍यून करण्‍यासाठी प्रयत्न करायला हवा, तसेच ‘आपल्‍यात सेवा परिपूर्ण करण्‍यासाठी कोणता गुण न्‍यून पडत आहे ?’, तो वाढवण्‍यास प्राधान्‍य द्यायला हवे.

१ उ. ‘अन्‍य साधक साधनेचे कसे प्रयत्न करत आहेत ?’, ते विचारून तसे प्रयत्न करायला हवेत.

१ ऊ. शिकलेले कृतीत आणा ! : एखाद्याने गाडी चालवून दाखवली की, ‘तो गाडी चालवायला शिकला’, असे आपण म्‍हणतो, म्‍हणजे शिकलेले कृतीत आणायला हवे.

१ ए. जिज्ञासू वृत्ती असेल, तर शिकता येते. जिज्ञासा जागृत झाली की, देवच सुचवतो. पुढे आपण आपल्‍याकडून झालेल्‍या चुकांमधूनही शिकत जातो.

कितीही शिकलो, तरी ते अल्‍पच आहे. ते (ज्ञान) आपल्‍या कल्‍पनाशक्‍तीच्‍या बाहेर आहे. परात्‍पर गुरु डॉक्‍टर आपल्‍याला सतत शिकण्‍यातील आनंद घेण्‍यास सांगतात. शिकण्‍यातच आनंद आहे.’’

२. सद़्‍गुरु दादांची अनुभवलेली प्रीती !

२ अ. साधकांना प्रयत्न करायला सांगतांनाही त्‍यांचा विचार करणे : वरील मार्गदर्शन केल्‍यावर मला प्रयत्नांचा ताण येऊ नये; म्‍हणून सद़्‍गुरु दादा मला म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही दिवसातून २ – ३ वेळा एखादे सूत्र लिहू शकता. आता तुम्‍ही जे काही लिहून घेतले आहे, त्‍याचे छायाचित्र काढून मला पाठवा.’’ तेव्‍हा ‘सद़्‍गुरु दादा साधकांना प्रयत्न करायला सांगतांनाही त्‍यांचा किती विचार करतात !’, हे पाहून कृतज्ञतेने माझे डोळे पाणावले आणि माझी भावजागृती झाली. यातून देवाने मला त्‍यांच्‍यातील सतर्कता आणि प्रीती या गुणांचे दर्शनही घडवले.

२ आ. साधिकेच्‍या आईच्‍या प्रकृतीची विचारपूस करून तिला नामजप सांगणे : सद़्‍गुरु दादांशी दूरभाषवर अनौपचारिक बोलतांना मी त्‍यांना म्‍हणाले, ‘‘आईची प्रकृती ठीक नसल्‍याने सध्‍या मी घरी आले आहे.’’ तेव्‍हा त्‍यांनी लगेच आईचा त्रास जाणून घेऊन ‘त्‍यावर कोणता नामजप करायचा ?’, ते मला सांगितले. दुसर्‍या दिवशी त्‍यांनी पुन्‍हा एक नामजप पाठवला आणि आईला तो नामजप नियमित करायला सांगितला. ते म्‍हणाले, ‘‘पुढे नामजपादी उपाय मिळण्‍यास विलंब झाला, तर तोपर्यंत हा नामजप करता येईल.’’ त्‍यांच्‍या या बोलण्‍यामुळे आम्‍हा सर्वांना पुष्‍कळ कृतज्ञता वाटली. तेव्‍हा ‘देवाने किती दिले आहे ! आता त्‍याने काही द्यायचे राहिले नाही’, या विचाराने माझी भावजागृती झाली.

३. कृतज्ञता !

‘गुरुमाऊली, ‘साक्षात् सद़्‍गुरु राजेंद्रदादांच्‍या माध्‍यमातून तुम्‍ही आमच्‍या जीवनाचे सार्थक करत आहात. त्‍यांनी सांगितलेले प्रयत्न कृतीत आणण्‍यासाठी आमच्‍याकडून अखंड प्रयत्न करून घ्‍या’, अशी तुमच्‍या कोमल चरणी आर्त प्रार्थना आहे.’

– कु. श्रद्धा लोंढे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१०.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक