‘लष्कर-ए-खालसा’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेकडून भाजपच्या नेत्यांना पक्ष सोडण्यासाठी धमक्या !

भाजपचे खासदार घनश्याम लोधी

रामपूर (उत्तरप्रदेश) – ‘लष्कर-ए-खालसा’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेच्या संदीप सिंह या आतंकवाद्याने येथील भाजपचे खासदार घनश्याम लोधी यांना भाजपचा त्याग करण्याची आणि तसे न केल्यास त्यांच्यासहित त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. पंजाब, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील भाजपच्या अनेक नेत्यांना अशा प्रकारच्या धमक्या आल्या आहेत. लोधी यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर ही धमकी देण्यात आली आहे. तसेच भाजपच्या अन्य नेत्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि भारतीय सेनेलाही लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे.

मुंबई भाजप युवा मोर्चाचे प्रमुख तजिंदरसिंह तिवाना

१. मुंबई भाजप युवा मोर्चाचे प्रमुख तजिंदरसिंह तिवाना यांनाही त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर अशाच प्रकारची धमकी देण्यात आली. ही धमकही संदीप सिंह यानेच दिली.

२. उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद येथील भाजपचे कार्यकर्ते वीर सैनी यांनाही धमकी देण्यात आली. ते भाजपच्या किसान मोर्चा संघटनेचे पदाधिकारी आहेत. या धमकीमध्ये अश्‍लील घोषणा आणि ‘खलिस्तान झिंदाबाद’ असे लिहिण्यात आले आहे.

पाकिस्ताने बनवली आहे ‘लष्कर-ए-खालसा’ संघटना

पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने ‘लष्कर-ए-खालसा’ची स्थापना केली आहे. सामाजिक माध्यमांतून ही संघटना अधिक सक्रीय आहे. त्याद्वारे शीख तरुणांचा बुद्धीभेद करून या संघटनेत भरती करवून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आय.एस्.आय.चे अधिकारी फेसबुकवर ‘अमर खालिस्तानी’ ‘आझाद खालिस्तान’ नावाने खाती बनवून प्रसार करत आहेत.

लष्कर-ए-खालसाद्वारे जम्मू-काश्मीरमध्ये कारवाया करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अफगाण नागरिकांची भरती केली जात आहे.  त्यांना आतंकवादी कारवायांसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. या संघटनेत पंजाब आणि हरियाणा राज्यांतील शीख गुंडांची भरती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी त्यांना अमली पदार्थांच्या माध्यमांतून पैसे कमावण्याचे आमीष दाखवले जात आहे.

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवादासमवेत आता खलिस्तानी आतंकवाद वाढू लागला आहे. याकडे सरकारने अधिक गांभीर्याने पहात त्याची पाळेमुळे घट्ट होण्यापूर्वीच ती उखडून टाकणे आवश्यक आहे !