पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात असलेल्या दानपेट्यांमध्ये खोटे दागिने जमा झाले आहेत. भाविकांनी देवाकडे साकडे घातल्यानंतर नवस पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडचण असल्यास भाविक देवाला खोटे दागिने अर्पण करतात. (याविषयी धर्मशास्त्रातील पर्यायांचा भाविकांनी विचार करावा. – संपादक) काही भाविक खरे दागिने अर्पण करतात, तर काही भाविकांना खरे दागिने म्हणून खोटे दागिने विकून सराफ त्यांची फसवणूकही करतात. देवाला श्रद्धेने सोने-चांदी यांचे दागिने अर्पण करणार्या भाविकांनी स्वत:ची फसवणूक टाळण्यासाठी सराफांकडून दागिन्यांची पावती घ्यावी, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. सध्या मंदिराकडे ३१ किलो सोने आणि १ सहस्र ५० किलो चांदी जमा झालेली असून या दागिन्यांच्या विटा सिद्ध करण्यात येणार आहेत, तर ३० किलो खोटे दागिने मंदिर समितीजवळ पडून आहेत. भाविकांनी अर्पण केलेले सर्व दागिने मंदिर समिती विश्वसनीय सराफाकडून पडताळून घेते.