मुंबई येथील स्‍वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांची महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्राला भेट !

डॉ. भरत बलवल्ली यांचा परिचय

स्‍वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांचे संगीताचे शिक्षण ग्‍वाल्‍हेर घराण्‍याचे प्रसिद्ध गुरु पंडित यशवंतबुवा जोशी यांच्‍याकडे, तर त्‍यांचे हार्मोनियमचे शिक्षण पंडित तुळशीदास बोरकर यांच्‍याकडे झाले आहे. ‘मास्‍टर दिनानाथ मंगेशकर यांच्‍या गायकीचा ठसा त्‍यांच्‍या गायकीत दिसून येतो’, हे त्‍यांच्‍या गायकीचे वैशिष्‍ट्य आहे. त्‍यांचे अनेक अल्‍बम प्रसिद्ध झाले आहेत. करवीर पीठाच्‍या शंकराचार्यांनी त्‍यांना वर्ष २००५ मध्‍ये ‘स्‍वराधीश’, तर मुंबई येथील ‘सुरसिंगार संसद’ यांनी डॉ. बलवल्ली यांना ‘सुरमणी’ ही पदवी प्रदान केली आहे. त्‍यांनी शास्‍त्रीय संगीतासह नाट्यसंगीताच्‍या अनेक मैफिलीही भूषवल्‍या आहेत. ते दत्त संप्रदायानुसार साधनाही करतात.

ईश्‍वरप्राप्तीसाठी संगीतयोग

फोंडा (गोवा) – नामवंत शास्‍त्रीय गायक, संगीतकार आणि स्‍वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांनी १० डिसेंबर २०२२ या दिवशी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्राला भेट दिली. या वेळी त्‍यांच्‍यासमवेत त्‍यांचे मावस बंधू श्री. देवदत्त घोलप हेही होते. डॉ. बलवल्ली आणि श्री. घोलप यांना महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संगीत विभागाच्‍या समन्‍वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के) यांनी संशोधन केंद्राची माहिती सांगितली, तसेच त्‍यांना संगीत संशोधनाच्‍या कार्याविषयीची माहिती देणारी ध्‍वनीचित्रफीत दाखवण्‍यात आली. डॉ. भरत बलवल्ली यांनी सर्व माहिती आत्‍मीयतेने ऐकली. या वेळी विश्‍वविद्यालयाचे सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी डॉ. भरत बलवल्ली यांचा शाल, श्रीफळ आणि सनातन-निर्मित भगवान शिवाचे चित्र देऊन सत्‍कार केला.

डॉ. भरत बलवल्ली (उजवीकडे) यांचा भगवान शिवाची प्रतिमा देऊन सत्‍कार करतांना सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

या वेळी श्री. देवदत्त घोलप यांनीही संगीत संशोधनाचे कार्य आवडल्‍याचे सांगून विश्‍वविद्यालयाचे संपूर्ण कार्य जिज्ञासेने जाणून घेतले. संशोधन केंद्रातील उच्‍चशिक्षित साधक पूर्णवेळ साधना आणि सेवा करत असलेले बघून त्‍यांना पुष्‍कळ आश्‍चर्य वाटले.

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे कार्य पुष्‍कळ चांगले ! – स्‍वराधीश डॉ. भरत बलवल्ली

काही वर्षांपूर्वीच आमच्‍या एका परिचितांनी मला या संशोधन केंद्रात येण्‍याविषयी विचारले होते. त्‍या वेळी शक्‍य झाले नाही; परंतु आज तो योग आला. हे कार्य पुष्‍कळ चांगले आहे. भारतात हे दुर्दैव आहे की, लोकांमध्‍ये संशोधनाविषयी जिज्ञासा नाही. त्‍यामुळे संशोधन करण्‍यासाठी लोक वेळही देत नाहीत. महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयासारखे भारतीय कला आणि विद्या यांचे महत्त्व सांगणारे विद्यापीठ अमेरिकेत निर्माण झाले, तर ते अधिक चांगले होईल, असे मला वाटते; कारण विदेशातून आलेले सगळे ज्ञान भारतीय लगेच घेतात. भारतीय कलांचे महत्त्व आपल्‍याला विदेशातून आल्‍यावर पटते, हे आपले दुर्दैवच आहे.’’