डिसेंबरमध्ये युवा पिढीला ‘पतंग महोत्सवा’चे वेध लागतात. गल्लोगल्ली पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने थाटली जातात. मकरसंक्रांतीच्या दिवशी तर उत्साह आणि आनंद यांना उधाण येते. पूर्वी लहान मुले स्वतः साधा मांजा करून पतंग उडवण्याचा आनंद घेत होते; मात्र काळ पालटत गेल्यानंतर नायलॉन आणि चिनी मांजा यांची बाजारात पुष्कळ मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
आतापर्यंत चिनी बनावटीचे घातक आणि विषारी हवा प्रदूषण करणारे फटाके बाजारात विक्रीस आले होते. आता विक्रीस येत असलेला चिनी मांजा अतिशय घातक असल्याने तो मनुष्य आणि पक्षी यांच्यासाठी जीवघेणा ठरत आहे. गतवर्षी नाशिक येथे चिनी मांजाचा फास गळ्याभोवती आवळल्याने एका महिलेला जीव गमवावा लागला. त्या वेळी नागरिक आणि महिलेचे नातेवाइक यांनी आंदोलन केले होते. नायलॉन मांजामुळे प्रतिवर्षी शेकडो पशू-पक्षी घायाळ होतात, तर काही मरतात. या घटना वर्षभर घडत आहेत. नाशिक येथील अग्नीशमनदलाचे कर्मचारी आणि पक्षीमित्र यांनी गेल्या वर्षभरात साधारणत: १७० पक्ष्यांचा जीव वाचवला आहे. चिनी मांजामुळे मृत्यूच्या घटनांची संख्या वाढत असल्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने नायलॉन मांजावर बंदी घातली. पुढे मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने ती बंदी कायम केली; मात्र तरीही नायलॉन मांजाची विक्री छुप्या पद्धतीने चालूच आहे. याचा अर्थ बंदीच्या निर्णयाला महत्त्वच नाही, असे म्हणावे लागेल.
प्रशासन डिसेंबर-जानेवारीत मांजा विक्रेत्यांवर धाडी घालून लाखो रुपयांचा मांजा जप्त करते; पण ही कारवाई तुटपुंजी असते. कागदोपत्री बंदी घालून उत्पादनाकडे डोळेझाक करण्याचा प्रशासनाचा भोंगळ कारभार चालू आहे, असे म्हटल्यास चूक होणार नाही. चिनी मांजावर बंदी असेल, तर त्याचे उत्पादन आणि विक्री कशी होते ? असे उत्पादन आणि विक्री करणार्यांना पकडून त्यांच्या व्यवसायाचा परवाना रहित करून त्यांना कठोर शिक्षा होतांना दिसत नाही. मनुष्य आणि पक्षी यांच्यासाठी घातक ठरत असलेला चिनी मांजा कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी लोकांनी त्यावर बहिष्कार घालायला हवा, तसेच सरकारने या घातक मांजाची आयात आणि उत्पादन यांवर कायमस्वरूपी बंदी घालून सतर्कपणे त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. खरे पहाता देश संकटात असतांना पतंग उडवण्यामध्ये जनतेने वेळ घालवायला नको, यासाठीही जनतेचे प्रबोधन होणे महत्त्वाचे !
– श्री. सचिन कौलकर, मुंबई