रत्नागिरीत ३ जानेवारीपासून कीर्तनसंध्या कार्यक्रमाला प्रारंभ

चारुदत्त आफळेबुवा कीर्तनातून उलगडणार राजपुतांचा इतिहास !

रत्नागिरी – ३ ते ७ जानेवारी या कालावधीत शहरातील आठवडा बाजार येथील स्व. प्रमोद महाजन क्रीडासंकुलात कीर्तनसंध्या रंगणार असून राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यावर्षी कीर्तनातून राजपुतांचा इतिहास उलगडणार आहेत.

दोन वर्षांच्या कोरोना महामारीमुळे न झालेला कीर्तनसंध्या कार्यक्रम उद्या ३ जानेवारीपासून प्रतिदिन सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत चालू होत आहे. कीर्तनसंध्येच्या माध्यमातून आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांपासून ‘सर्जिकल स्ट्राइक’पर्यंतचा इतिहास कीर्तनातून लोकांसमोर मांडण्यात आला होता. यावर्षी आफळेबुवा राजपुतांचा इतिहास मांडतांना पृथ्वीराज चौहान, जयचंद गढवाल, राणा कुंभ, राणा संग, राणा प्रताप, संत मीराबाई यांच्याविषयी निरूपण करणार आहेत. हेरंब जोगळेकर (तबला), वरद सोहोनी (ऑर्गन), प्रथमेश तारळकर (पखवाज), उदय गोखले (व्हायोलीन) हे साथीदार संगीतसाथ करणार असून ध्वनीव्यवस्था उदयराज सावंत, तर मंडपव्यवस्था ओम साई मंडप डेकोरेटर्स सांभाळणार आहेत. कीर्तनसंध्येला सर्वांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे; मात्र या उपक्रमासाठी निधीची आवश्यकता असून देणगी सन्मानिकेद्वारे इच्छुकांना साहाय्य करता येऊ शकेल.

सध्या चालू असलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून या कार्यक्रमाला येतांना सर्वांनी मास्क लावून यावे, असे आवाहन कीर्तनसंध्या परिवाराने केले आहे.