सातारा, १ जानेवारी (वार्ता.) – ३१ डिसेंबरच्या पाश्र्वभूमीवर सातारा येथील शिवप्रेमींनी इतिहासाची साक्ष देणार्या ‘चारभिंती’ या हुतात्मा स्मारकावर खडा पहारा दिला. ३१ डिसेंबरच्या पाश्र्वभूमीवर सातारा शहरातील ऐतिहासिक ‘चारभिंती’वर पर्यटक नेहमीच गर्दी करतात. या ठिकाणी मद्यपान करून कर्णकर्कष आवाजात चित्रपटांच्या गाण्यावर अश्लील हावभाव करत रात्रभर धिंगाणा घालतात. ही गोष्ट लक्षात घेऊन सातारा येथील शिवप्रेमींनी चारभिंतीचे पावित्र्य जपण्यासाठी ३१ डिसेंबरला दिवसा आणि रात्री खडा पहारा देण्याचे नियोजन केले. याविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनही देण्यात आले होते. त्यांनीही शिवप्रेमींच्या या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
चारभिंतीची माहितीसातारा शहरात मध्यवर्ती ठिकाणी ‘चारभिंती’ हे एक हुतात्मा स्मारक आहे. हे एक पर्यटनस्थळसुद्धा आहे. सातारा शहरातील ‘अजिंक्यतारा’ गडाजवळ हे स्मारक आहे. छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी वर्ष १८३० मध्ये या ठिकाणाची निर्मिती केली होती. विजया दशमीच्या दिवशी सातारा येथून छत्रपतींची मिरवणूक काढतात. ही मिरवणूक राजघराण्यातील स्त्रियांना पहाता यावी म्हणून या ‘चारभिंती’ची निर्मिती केली. या ठिकाणाला १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ येथे स्मारकाची उभारणी झाली. या स्मारकात नावाप्रमाणे चारही बाजूंनी भिंती आहेत आणि मधोमध एक स्तंभ आहे. |