(म्हणे) ‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात रा.स्व. संघाचे कोणतेही योगदान नाही !’

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा फुकाचा आरोप

मुख्यमंत्री नितीश कुमार

पाटलीपुत्र (बिहार) – भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  काहीही योगदान नव्हते. संघाला स्वातंत्र्यलढ्याशी काहीही देणेघेणे नव्हते, असा आरोप बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनी केला.

नितीश कुमार म्हणाले की, माझे वडील स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. माझा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला; मात्र मी नंतर स्वातंत्र्यलढ्याची प्रत्येक गोष्ट समजून घेतली. भारताच्या स्वातंत्र्यातील म. गांधी यांचे योगदान आपण कधीही विसरू शकत नाही; मात्र आता काही लोक राष्ट्रपिताविषयी काय बोलत आहेत हे सर्वजण पहात आहेत. आता हे म्हणत आहेत, ‘जुन्या राष्ट्रपितांना विसरू जा, नवे राष्ट्रपिता आले आहेत.’ या नव्या राष्ट्रपितांनी भारतासाठी काय केले ? त्यांनी काही काम केले आहे का ? त्यांच्या काळात भारत कोणत्या क्षेत्रात पुढे गेला आहे ? त्यांनी केवळ नव्या तंत्रज्ञानाचा बलपूर्वक वापर केला आहे. आधी माध्यमे सरकार असो की विरोधी पक्ष, त्यांच्यावर त्यांची मते अगदी स्पष्टपणे मांडायची; मात्र आज माध्यमांना तेच लिहावे लागत आहे जे सांगितले जात आहे.

संपादकीय भूमिका 

  • भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. ‘स्वातंत्र्यलढ्यात संघाने हिंदूंसाठी काय केले ?’, हे जनता जाणून आहे. त्यामुळे स्वातंत्र्यलढ्यात कुणी किती सहभाग घेतला, याविषयी आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी स्वातंत्र्यानंतर नितीश कुमार यांच्या समाजवादी नेत्यांनी भ्रष्टाचार, मुसलमानांचे लांगूलचालन, हिंदूंना दुजाभावाची वागणून आदी कुकृत्ये करून देशाची किती हानी केली, याचा हिशोब नागरिकांना द्यावा !
  • नितीश कुमार यांनी भाजपला सोपचिठ्ठी देऊन लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली. नितीश कुमार यांच्यात धारिष्ट्य असेल, तर त्यांनी लालूप्रसाद यादव यांनी मुख्यमंत्री असतांना राज्याला कशा प्रकारे लुटले, याविषयी बोलावे !