वाहतूक नियमांची प्रभावी कार्यवाही व्हावी !

प्रतिकात्मक चित्र

सध्या दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या आणि वाढते अपघात हा चिंतेचा विषय झाला आहे. अनेक वेळा रस्ते अपघातांमध्ये वाहनचालक चुकीच्या पद्धतीने वाहन चालवत असल्याचे आढळते; मात्र चूक कुणाचीही असली, तरी अपघातामुळे अनेक निरापराध नागरिकांचा अकारण मृत्यू होतो. या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नियमांचे पालन करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने काही नियम घालून दिले आहेत. त्यांचे पालन नागरिकांकडून काटेकारेपणे होत आहे किंवा नाही ? हे पहाण्यासाठी सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायूवेग पथकांच्या वतीने पडताळणी करण्यात आली. या वेळी बहुतांश वाहनचालकांकडे ‘फिटनेस’ प्रमाणपत्रासह अन्य कागदपत्रे नसतात. यामुळे परिवहन कार्यालयाकडून संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

सातारा जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने गेल्या २ वर्षांत विविध ठिकाणी २१ सहस्र ५७६ वाहनांवर कारवाई केली. या कारवाईच्या माध्यमातून १० कोटी ५४ लाख ८२ सहस्र रुपयांचा दंड आणि कर वसूल करण्यात आला. यासह ३ सहस्र ६९९ वाहनचालकांकडे ‘फिटनेस’ प्रमाणपत्र नसणे, वाहन विमा नसणारी ५ सहस्र ९५ वाहने, विनाशिरस्त्राण (हेल्मेट) वाहन चालवणारे १ सहस्र ७६३ असून ‘रिफ्लेक्टर’ नसणारी वाहने १ सहस्र ८२० आहेत. गाडीच्या छतावरून माल वाहतूक करणार्‍या वाहनांची संख्या २५४ असून क्षमतेहून अधिक प्रवासी वाहून नेणार्‍या वाहनांची संख्या १४६ आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली. एका जिल्ह्याची ही संख्या पाहिल्यास ‘देशात कुणाला शिस्त आहे कि नाही ?’ असा प्रश्न पडतो.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहनधारकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी प्रतिवर्षी विविध मोहिमा राबवल्या जातात; मात्र अनेक वेळा मोहिमांपुरती नागरिकांमध्ये जागृती होते. मोहीम संपली की, पहिले पाढे पंचावन्न ! उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने दंड आणि कर आकारून वाहन सोडून देण्यात येते. यातून नागरिकांमध्ये पालट होत असेल, असे वरील आकडेवारीवरून वाटत नाही. दंडाच्या रकमेसमवेत पुन्हा चूक झाल्यास संबंधितांना कठोर शिक्षा करणे, वाहनांना योग्य आवाजाचे ‘हॉर्न’ नसतील, तर ते लगेचच पालटण्यास भाग पाडणे, अशा प्रकारे उपाययोजना करू शकतो. ‘कायदे तितक्या पळवाटा’, असे असले, तरी प्रभावी कार्यवाही झाली, तरच वाहनचालक पुन्हा चूक करण्यास धजावणार नाहीत, हे निश्चित !

– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा