नागपूर, २९ डिसेंबर (वार्ता.) – वन्यप्राण्यांकडून होणार्या शेतपिकांच्या हानीविषयी शासन नवीन धोरण आखत आहे. पीकहानी झाल्यापासून ३० दिवसांत हानी भरपाई मिळावी, असा शासनाचा विचार आहे. ३० दिवसांत हानीभरपाईची रक्कम मिळाली नाही, तर संबंधित अधिकार्यांच्या वेतनातून व्याजाची रक्कम देण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. विधी आणि न्याय विभागाच्या सल्ल्याने याविषयी कार्यवाही केली जाईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मागील ५-६ वर्षांत राज्यातील वन्यप्राण्यांची संख्या तिपटीने वाढली आहे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आदी जिल्ह्यांत वन्यप्राणी पिकांची मोठ्या प्रमाणात हानी करत आहेत. पिकांची हानी टाळण्यासाठी जैव कुंपण, रोजगार हमी योजनातून निधीची तरतूद, शेतकर्यांना झटका यंत्र देणे, कुंपण म्हणून बांबूंचे कुंपण, तारेचे कुंपण आदी विविध उपायांचाही विचार करण्यात येत आहे. यापूर्वी शेतीपिकांसाठी हेक्टरी २५ सहस्र रुपये इतकी हानी भरपाई दिली जात होती, ही रक्कम ५० सहस्र रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.