‘अर्बन स्ट्रीट’च्या नावाखाली होणारी २५ कोटी रुपयांची उधळपट्टी पिंपरी-चिंचवड महापालिकेने थांबवावी !

थेरगाव (पुणे) येथील नागरिकांनी स्वाक्षरी करत निषेध नोंदवला

पिंपरी (पुणे) – डांगे चौक ते ‘बिर्ला रुग्णालय’ या रस्त्यावर ‘अर्बन स्ट्रीट’च्या (शहरी रस्ता) कामासाठी २५ कोटी रुपयांच्या उधळपट्टीला महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या विरोधामध्ये थेरगाव परिसरातील नागरिकांनी डांगे चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर २५ डिसेंबर या दिवशी स्वाक्षरी अभियान राबवून यास विरोध दर्शवला आहे. डांगे चौक ते बिर्ला रुग्णालय हा रस्ता ३४ मीटरचा आहे. जर हा रस्ता ‘अर्बन स्ट्रीट’च्या नामांकनाप्रमाणे विकसित झाला, तर रस्त्याची रुंदी अल्प होऊन वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते. वर्ष २०२०-२१ मध्ये याच रस्त्यावर ६५ लाख रुपये व्यय करून पदपथाचे काम झाले असून ते सध्याही सुस्थितीमध्ये आहे. या ‘अर्बन स्ट्रीट’करिता अंदाजपत्रकामध्ये १० कोटी रुपयांची मान्यता असूनही २५ कोटींच्या खर्चास आयुक्तांनी मान्यता दिल्याचा निवेदनामध्ये उल्लेख केला आहे.