१. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा करणार्या साधकांकडून संकलन करतांना झालेल्या चुकांविषयी आलेली लेखमाला वाचून स्वतःचे लिखाणही चुकांविरहित करण्यासाठी प्रयत्न करणे
‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा करणार्या साधकांकडून वार्ता, लेख आणि अनुभूती यांचे संकलन करतांना झालेल्या चुकांविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये लेखमाला प्रकाशित झाली होती. त्यातून मला पुष्कळ शिकता आले. मीही न्यायालयीन कामांसाठी बरेच दावे, नोटिसा किंवा विविध कायदेशीर नमुने सिद्ध करत असतो. ‘त्यातील लिखाण चुकांविरहित केले, तर त्यातून माझी कर्मयोगानुसार साधना होणार आहे’, असे मला जाणवले. मी मृत्यूपत्राचा एक नमुना सिद्ध केला होता. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शरण जाऊन प्रार्थना केली, ‘ही सेवा करतांना माझ्याकडून झालेल्या चुका मला सांगा आणि त्या माझ्याकडून सुधारून घ्या.’ तेव्हा ‘मृत्यूपत्र सिद्ध करतांना वाक्यरचनेत झालेल्या चुका गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) माझ्याकडून सुधारून घेत आहे’, असे मला अनुभवता आले. त्यामुळे ती सेवा करतांना मला पुष्कळ आनंद मिळाला. यातून ‘प्रत्येक साधकाची परिपूर्ण सेवेतून साधना व्हावी’, हा गुरुमाऊलीचा दृष्टीकोन मला शिकता आला.
२. इतरांशी बोलतांना अल्प शब्दांमध्ये आणि सोप्या भाषेत बोलल्यावर चांगला प्रतिसाद मिळणे
‘एखाद्या व्यक्तीशी बोलतांना किंवा जिज्ञासूंना सूत्रे सांगतांना ती अल्प आणि इतरांना सहज समजतील, अशा सोप्या शब्दांत सांगितल्यास स्वतःच्या मनावरचा अनावश्यक ताण अल्प होतो, तसेच सात्त्विक अन् भगवंताला अपेक्षित अशी वाक्यरचना करण्याचा प्रयत्न केल्यामुळे समोरच्या व्यक्तीचाही लगेच प्रतिसाद मिळतो’, असे मला अनुभवता आले.
३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चैतन्य कसे कार्य करते ?’, याचा येत असलेला अनुभव !
अ. काही वेळा मला अकस्मात् समष्टी सेवेसाठी बाहेरगावी जावे लागते. तेव्हा बर्याच वेळा आरक्षण मिळत नाही किंवा वाहनही मिळत नाही; परंतु ‘देवाचे कार्य तोच करून घेणार आहे’, असा भाव असतो. सकारात्मकतेमुळे अडचणी सुटून ‘गुरुमाऊलीचे चैतन्य कसे कार्य करून घेते ?’, याचा अनुभव येतो.
आ. सेवा करतांना शारीरिक त्रास होत असतो. तेव्हा ‘देवच यातून मार्ग काढणार असून मी केवळ त्याला सामोरे जायचे आहे’, असा विचार केल्यावर देवाने मार्ग दाखवल्याचे मी अनेकदा अनुभवले आहे. अशा प्रसंगांतून ‘गुरुमाऊलीचे चैतन्यच सर्वांकडून सेवा आणि साधना करून घेत आहे’, हे मला शिकता आले.
४. ‘संतांचे आज्ञापालन करून त्वरित तशी कृती केल्याने त्यांचा संकल्प कार्यरत होतो’, याची अनुभूती येणे
एका साधिकेच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या मिळकतीविषयी कायदेशीर प्रक्रिया करण्याची सेवा माझ्याकडे होती. त्यासाठी ‘साधिका आणि तिची आई यांनी साधिकेच्या भावाला प्रथम कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ ॲटर्नी) करून दिल्यास त्यांचा सेवेचा वेळ जाणार नाही’, असे एका संतांनी त्यांना सुचवले होते. ‘विधिनियमांच्या (कायद्याच्या) प्रक्रियेचा अभ्यास केल्यावर लगेचच कुलमुखत्यारपत्र करून चालणार नाही’, असे मला वाटले; परंतु ‘संतांनी सांगितले आहे, तसे करायला हवे’, असे मी साधिकेला सांगितले. त्यानुसार आम्ही प्रथम कुलमुखत्यारपत्र केले. त्यानंतर काही दिवसांतच साधिकेकडून ‘मिळकती विषयीची प्रक्रिया वेगाने पूर्ण झाली’, असे मला समजले. यावरून ‘संतांचे आज्ञापालन करून त्वरित कृती केल्यास त्यांचा संकल्प कार्यरत होतो’, हे मला शिकता आले.
५. अनुभूती – न्यायालयीन कामे करतांना भावप्रयोग केल्यावर देवीचे अस्तित्व जाणवून भावजागृती होणे :
मी अधिवक्ता असल्यामुळे रज-तम असणार्या वातावरणाच्या ठिकाणी, उदा. पोलीस ठाणे, कारागृह इत्यादी ठिकाणी मला जावे लागते. एकदा अशा ठिकाणी गेल्यावर ‘अनिष्ट शक्तींचा त्रास होऊ नये’, यासाठी मी भावप्रयोग केला. तेव्हा मला सूक्ष्मातून ‘देवीमातेच्या चरणांतील पैंजणांचा आवाज ऐकू आला आणि माझ्यासमोर साक्षात् आई तुळजाभवानी येऊन तिने मला आशीर्वाद दिला’, असे जाणवले. त्यामुळे माझी भावजागृती झाली.
‘गुरुमाऊली आणि संत यांची साधकांवर अगाध प्रीती अन् कृपा आहे ?’, याची जाणीव होऊन माझे अंतःकरण दाटून आले आणि माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– अधिवक्ता नीलेश सांगोलकर, अधिवक्ता संघटक, हिंदु विधीज्ञ परिषद, पंढरपूर. (२८.१२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |