आटपाडी (जिल्हा सांगली) – रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या तरुणीवर बळजोरीने संजय गेळे आणि अश्विनी गेळे या पती-पत्नीने ख्रिस्ती धार्मिक विधी केल्याचा प्रकार केला होता. गेळे दांपत्यांनी केलेल्या या प्रकाराच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत धर्मांतराच्या निषेधार्थ आटपाडी शहर २५ डिसेंबरला बंद ठेवण्यात आले. जादूटोणा करणारे आणि लोकांचा अपलाभ उठवत त्यांचे धर्मांतर करणारे यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली आहे.
आटपाडी येथील गेळे दांपत्याने त्यांच्या अंगात दिव्य शक्ती असल्याचे भासवले. जादूटोणा करून रुग्ण बरा करण्याच्या उद्देशाने वरद रुग्णालय येथील अतीदक्षता विभागात रुग्णांचे नातेवाईक असल्याची खोटी माहिती दिली. अतीदक्षता विभागात बळजोरीने प्रवेश केला. तेथे उपचार घेणार्या १८ वर्षीय युवतीच्या कपाळावरून बोटे फिरवून बोटाने शस्त्रक्रिया करत असल्याचे भासवले. या प्रकरणी संपतराव नामदेव धनवडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराला वाचा फोडण्यासाठी ‘बंद’चे आवाहन करण्यात आले होते.
या संदर्भात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने एक दिवसापूर्वी आटपाडी पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालय यांवर मोर्चा काढून ‘गेळे दांपत्याला अटक करावी आणि त्यांच्या संपूर्ण कारभाराचे अन्वेषण करावे’, असे निवेदन दिले आहे.
गेळे कुटुंबियांना आटपाडी तालुक्यातून हद्दपार करावे ! – मोहनभाऊ देशमुख, शिवसेना
या संदर्भात शिवसेनेचे आटपाडी तालुकाप्रमुख श्री. मोहनभाऊ देशमुख म्हणाले, ‘‘गेली १० वर्षे गेळे कुटुंबीय गरिबांना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. गेळे कुटुंबियांमुळे आटपाडी तालुक्यात असंतोष निर्माण होत आहे. तरी गेळे कुटुंबियांवर कारवाई करून त्यांना आटपाडी तालुक्यातून हद्दपार करावे, अशी मागणी आम्ही करत आहोत.’
संपादकीय भूमिकाशहर बंद ठेवून धर्मांतरचा निषेध करत धर्मरक्षणासाठी तत्पर असणाऱ्या आटपाडी शहरवासियांचे अभिनंदन ! |