तुर्भे-वाशी रस्त्यावरील ‘सर्व्हिस रोड’वर अनेकविध समस्या !

पोलिसांसह महापालिकेची डोळेझाक !

नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई, २४ डिसेंबर (वार्ता.) – तुर्भे-वाशी लिंक रोडवरील ‘सर्व्हिस रोड’वर गर्दुल्ले, फेरीवाले, गॅरेजवाले यांच्यामुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत. पोलिसांसह महापालिका अतिक्रमण विरोधी विभागालाही याची माहिती आहे. असे असूनही ते त्याकडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणार्‍या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

(प्रतिकात्मक चित्र)

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत येणार्‍या असंख्य ट्रकचा वाहनतळ गेल्याने रस्ते व्यापल्याने नागरिकांची गैरसोय !

तुर्भे येथे आशिया खंडातील सर्वांत मोठी बाजारपेठ अर्थात् मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ५ बाजारपेठा आहेत. यामध्ये कांदा-बटाटा, फळे, भाजीपाला, मसाले आणि अन्नधान्य यांच्या बाजारपेठांमध्ये प्रतिदिन राज्यासह भारतातून सहस्रो ट्रक शेतमाल येत असतो. यासाठी सिडकोने मसाला बाजारपेठेच्या पूर्वेला मोठे ‘ट्रक टर्मिनल’ उभारले होते. आता या जागेवर मोठा गृहप्रकल्प उभारला जात आहे. त्यामुळे या पाच ही बाजारपेठांच्या लगतच्या रस्त्यांवर शेकडो ट्रक उभे करून ठेवलेले दिसतात. आता हे रस्ते अल्प पडू लागल्याने तुर्भे-वाशी लिंक रोडच्या लगतच्या ‘सर्व्हिस रोड’वर ट्रक उभे केले जात आहेत. सर्व्हिस रोडचा केवळ काही भाग महापालिकेने पैसे देऊन वाहन उभारण्यासाठी दिला आहे; तो अपुरा पडत असल्याने तुर्भे स्मशानभूमी ते ए.पी.एम्.सी. वाहतूक पोलीस चौकीपर्यंत अनधिकृतपणे वाहने उभी केली जातात.

यांच्यावर कारवाई कोण करणार ?

अनधिकृत फेरीवाल्यांवर लोकप्रतिनिधी कारवाई करू देत नसल्याने नागरिकांची गैरसोय !

सर्व्हिस रोडवर सिटी मॉल ते वाशीच्या दिशेने जातांना लागणार्‍या नाल्यावरील मसाला बाजाराच्या दरवाजापर्यंत फळे, भाजी, कांदा-बटाटा विक्रेते, केशकर्तन करणारे, फेरीवाले, ठाण मांडून बसले आहेत. या प्रकरणी तुर्भे विभाग कार्यालयातील अतिक्रणविरोधी पथकाला माहिती असूनही ते यावर कारवाई करत नाही. या फेरीवाल्यांवर कारवाई न करण्यासाठी काही लोकप्रतिनिधींकडून राजकीय दबाव आणला जात असल्याचे कारण पुढे केले जात आहे.

अनधिकृत गॅरेज आणि गर्दुल्ले यांच्याकडे दुर्लक्ष करून नागरिकांची गैरसोय करणारे पोलीस प्रशासन !

याच सर्व्हिस रोडवर वाशीहून तुर्भेकडे येणार्‍या मार्गावर कांदा-बटाटा बाजाराच्या ‘गेट क्रमांक २’ समोरील बस थांब्यालगत अनधिकृरीत्या रिक्शाचे गॅरेज चालवले जात आहे. त्यापुढे मसाला बाजाराच्या गेटसमोर ४ ते ५ गर्दुल्ले दिवस-रात्र पडून असतात. येथे अमली पदार्थांची विक्रीही होत असल्याचे समजते. स्थानिक महिला या सर्व्हिस रोडवरून मुलांना चालत वाशी येथे शाळेत घेऊन जात असतात. त्यांना या सर्व गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

लाखो रुपये खर्चून केलेल्या सर्व्हिस रोडची दुरवस्था !

नवी मुंबई महानगरपालिकेने तुर्भे स्मशानभूमी ते वाशी आरेंजा चौकपर्यंतचा सर्व्हिस रोड बनवण्यासाठी गेल्या ५ वर्षांत लाखो रुपये खर्च केले आहेत; परंतु या मार्गाची फेरीवाले, गॅरेज, गर्दुल्ले यांच्यामुळे पुरती दुरवस्था झाली आहे. तुर्भे विभाग कार्यालयातील कर्मचारी लोकप्रतिनिधींचे नाव पुढे करून कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत, तर लोकप्रतिनिधी पालिका कर्मचार्‍यांचे फेरीवाल्यांशी साटेलोटे असल्याने ते कारवाई करत नसल्याचा आरोप येथील त्रस्त नागरिक करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • ट्रकच्या तळाची जागा गृहप्रकल्पासाठी देतांना ट्रक उभे करण्यासाठी सिडकोने पर्याय का काढला नाही ? तसा पर्याय नसेल, तर ती जागा गृहप्रकल्पाला देणे योग्य आहे का ?
  • अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करू न देणारे स्वार्थी लोकप्रतिनिधी ज्या जनतेचे प्रतिनिधी आहेत, त्या जनतेची किती गैरसोय होत आहे, हे ध्यानात घेत नाहीत !
  • नागरिकांच्या सुविधांकडे लक्ष न देणार्‍या प्रशासनाचा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ?