गायींवर देशात चालू असलेले संशोधन गावागावांत पोचले पाहिजे ! – पद्मविभूषण डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ संगणकशास्त्रज्ञ

पुणे येथे ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषद २०२२’ उद्घाटन सोहळा उत्साहात !

पुणे येथील ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषदे’मध्ये ‘विश्व कामधेनू महोत्सव स्मरणिके’चे प्रकाशन करतांना उपस्थित मान्यवर

भोसरी (वार्ता) – जनतेचे भरण पोषण आणि कल्याण व्हायचे असेल, तर नवीन पिढीसमोर गायीचे महत्त्व आणि महात्म्य ठेवले पाहिजे. ‘एक दिवस शाळा घराघरात येतील’ हे स्वामी विवेकानंद यांचे स्वप्न आज सत्यात उतरले आहे. सध्या जगातील सर्वाधिक विद्यापीठे भारतात आहेत. यादृष्टीने विद्यार्थ्यांसाठी ‘पंचगव्य मिशन’ राबवले, तर यातून संपूर्ण भारतभर गो आधारित अर्थव्यवस्था निर्माण होईल, हे निश्चित. मी शाळेत असतांना देशाची लोकसंख्या जवळपास ३५ कोटी इतकी होती. सध्या १३५ कोटी झाली आहे. नवीन पिढीला गायीचे महत्त्व समजले पाहिजे. आयआयटीसह देशातील अनेक गावांमध्ये गायींवर संशोधन चालू आहे. देशाची अर्थव्यवस्था गायींवर आधारित होईल का ? याविषयीचा आराखडा सिद्ध होत आहे. गायींवर देशात चालू असलेले संशोधन गावागावात पोचले पाहिजे, असे प्रतिपादन या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ परम संगणक निर्माते डॉ. विजय भटकर यांनी केले. ते कामधेनू महोत्सव अर्थात् विश्व गो परिषद २०२२ च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

या प्रसंगी ‘विश्व कामधेनू महोत्सव स्मरणिके’चे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सरसंघचालक पू. मोहनजी भागवत यांच्या संदेशाचे अनुजा कुलकर्णी यांनी वाचन केले, तसेच श्री श्री श्री रविशंकरजी, प.पू. स्वामी गोविंददेवगिरि महाराज यांनी कार्यक्रमास शुभाशीर्वाद पाठवले. या महोत्सवास अमेरिका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ या देशांतूनही गोप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा देश-विदेशातील लाखो ग्रोप्रेमींनी संगणकीय प्रणालीद्वारे (ऑनलाईन) लाभ घेतला.

कार्यक्रमाचा आरंभ संवत्सधेनू पूजनाने झाला. त्यानंतर वेदमंत्र पठण झाल्यावर श्री श्री श्री विश्वचैतन्य सद्गुरु नारायण महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. ‘जनमित्र सेवा संघा’चे कार्यवाह डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पुणे महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक, तसेच राजस्थानी प्रकोष्ठ भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जयप्रकाश राधा किशन पुरोहित यांच्या सारख्या अन्य बहुसंख्य जणांच्या सहकार्यातून गो परिषद यशस्वी होत आहे.

गायीच्या सहवासात सर्व शारीरिक रोग नष्ट होतात यासाठी गोपालन करणे अत्यावश्यक ! – श्री श्री प.पू. १००८ यति अनिरुद्धतीर्थ महाराज
श्री श्री प. पू. १००८ यति अनिरुद्धतीर्थ महाराज म्हणाले, ‘‘गाय ही त्रैलोक्याची ‘माता’ आहे. तिन्ही लोक गोरक्षित आहेत. पृथ्वी ७ स्तंभांवर आधारलेली आहे. त्यामध्ये गाय, ब्राह्मण, वेद, सतीमाता, सत्य वचन बोलणारा, निर्लोभी आणि दानी व्यक्ती यांचा समावेश आहे. यामध्ये पहिला स्तंभ गाय टिकला, तर बाकीचे स्तंभ टिकतील. या सातपैकी गाय, ब्राह्मण, वेद, सतीमाता हे प्रमुख ४ स्तंभ आहेत. आपल्या देशात गोवंशच होता; मात्र आपल्या बुद्धीमान लोकांमुळे हानी होईल; म्हणून परदेशातील लोकांनी संकरित जर्सी गायी आपल्याकडे दिल्या. साधारणपणे ४० वर्षांपूर्वी वर्णसंकर करून जर्सी गाय निर्माण करण्यात आली. त्या गायीच्या दुधापासून माणसाची बुद्धी मंद झाली. धर्म-अधर्म समजेनासे झाले. यासाठी गोपालन करणे अत्यावश्यक आहे. भगवान श्रीकृष्णाने गोपालन केले. गायीच्या सहवासात आल्यानंतर सर्व शारीरिक रोग नष्ट होतात, धनसंपत्ती प्राप्त होते. भारतावर परकियांनी अनेक आक्रमणे केली. येथील संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला; परंतु ईश्वराच्या अस्तित्वामुळे आपला (हिंदु धर्माचा) नाश करू शकले नाहीत.’’

गायींविषयी आस्था वाढली तरच गायी वाचतील ! – कांतीलाल संघवी, पांजरपोळ ट्रस्टचे प्रमुख

या वेळी पांजरपोळ ट्रस्टचे प्रमुख कांतीलाल संघवी म्हणाले की, ही गोशाळा वर्ष १८५५ मध्ये ३ पारशी आणि २ हिंदु लोकांनी, गायींबद्दलचे प्रेम वाढावे यासाठी चालू केली. चार्‍यासाठीच्या वनांवर सरकारने बांधकामे केली आहेत. त्यामुळे गोमातेसाठी आता काही उरले नाही. त्यामुळे गायींबद्दल आस्था वाढली, तरच गायी वाचतील.

या वेळी पांजरपोळ ट्रस्टचे प्रमुख कांतीलाल संघवी, प.पू. यती अनिरुद्धतीर्थ महाराज, नारायणपूर येथील श्री श्री श्री विश्वचैतन्य सद्गुरु नारायण महाराज, ज्येष्ठ कृषीतज्ञ मदनगोपालजी वाष्णेय, राजस्थानच्या माता पावनेश्वरी, जनमित्र सेवा संघाचे अध्यक्ष अधिवक्ता ज्ञानेश्वर तुपे, केंद्र सरकारच्या बेटी बचाओ अभियानाचे संयोजक डॉ. राजेंद्र फडके, काका काटे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर राहुल जाधव, पंडित वसंतराव गाडगीळ, श्री. मिलिंद एकबोटे, गोरक्षक श्री. शिवशंकर स्वामी, आमदार श्री. महेश लांडगे, श्री. विजय जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

वैशिष्ट्यपूर्ण

आळंदी येथील वारकरी विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंगाच्या गजरात दिंडी काढून मान्यवरांचे स्वागत केले. श्री श्री प.पू. १००८ यति अनिरुद्धतीर्थ महाराज यांनी उपस्थितांकडून ‘श्रीराम’ नामाचा जप आणि श्री श्री श्री विश्वचैतन्य सद्गुरु नारायण महाराज यांनी ‘श्री दत्ता’चा नामजप करून घेतला.