हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने जळगाव येथील वाहनफेरीत धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

जळगाव, २३ डिसेंबर (वार्ता.) – येथे २५ डिसेंबर या दिवशी होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने २३ डिसेंबर या दिवशी वाहनफेरीच्या माध्यमातून शहरवासियांना सभेचे निमंत्रण देण्यात आले. वाहनफेरीचा प्रारंभ नेहरू चौक येथे सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, स्वामी नारायण मंदिराचे नयनस्वामी महाराज, इस्कॉनचे चैतन्य प्रभूदासजी महाराज यांच्या हस्ते पूजनाने करण्यात आला. ही वाहनफेरीची सांगता शहरातील प्रमुख चौकांतून जाऊन शिवतीर्थ मैदान येथे करण्यात आली. या फेरीमध्ये २०० हून अधिक दुचाकी वाहनांसह ५०० महिला आणि पुरुष धर्मप्रेमी उत्स्फूर्तपणे उपस्थित झाले होते.

हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी, योग वेदांत सेवा समितीचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष श्री. अनिल चौधरी, हिंदु राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. मोहन तिवारी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. आकाश फडे, श्री. कपिल ठाकूर, शिवसेनेचे नगरसेवक (शिंदे गट) श्री. मनोज चौधरी, मा. नगरसेवक श्री. श्याम कोगटा, धर्मरथ फाऊंडेशनचे श्री. विनायक पाटील, रौद्र शंभू फाऊंडेशनचे श्री. तुषार सूर्यवंशी, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे श्री. धनंजय चौधरी, तसेच श्रीराम सेना, छायाचित्रकार-पत्रकार संघटना, जय गोविंदा मित्र मंडळ आदींनी सहभाग घेत सभा यशस्वी करण्याचा निर्धार केला. समारोप प्रसंगी सौ. कीर्ती वारके, धर्मरथ फाऊंडेशनचे विनायक पाटील, समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी सौ. वारके म्हणाल्या, ‘‘सभेला येतांना सर्वांनी स्वतःसमवेत घरातील महिलांनाही आणावे.’’

सभेला पाठिंबा दर्शवण्यासाठी शहरातील ३० रिक्शाचालक रिक्शाला भगवा ध्वज लावून फेरीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

धर्मध्वजाचे पूजन करतांना सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव आणि इस्कॉनचे चैतन्य प्रभूदासजी महाराज

भारत देश ‘लव्ह जिहाद’मुक्त करण्यासाठी सभेला उपस्थित रहा ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

वाहनफेरीच्या माध्यमातून हिंदूंच्या संघटन शक्तीचे दर्शन घडले आहे. सभेला येतांना प्रत्येकाने स्वत:समवेत इतरांनाही अधिकाधिक संख्येने घेऊया या. भारत देश ‘लव्ह जिहाद’मुक्त करण्यासाठी, तसेच धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र जागृती सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा.

वाहन फेरीमध्ये सहभागी धर्मप्रेमी

भगवा दिवस साजरा केल्याचा आनंद झाला ! – विनायक पाटील, धर्मरथ फाऊंडेशन, जळगाव

वाहनफेरी पाहून भगवा दिवस साजरा केल्याचा आनंद झाला. शिवाजीनगर भागातून शेकडोच्या संख्येने २५ डिसेंबरला हिंदु राष्ट्र जागृती सभेला उपस्थित राहू.

पूजन आणि पुष्पवृष्टी !

वाहन फेरीमध्ये सहभागी धर्मप्रेमी

फेरीच्या मार्गातील शास्त्री चौक, दाणा बाजार चौक, चित्रा चौक, गणपति मंदिर, शिवतीर्थ चौक, स्टेडियम चौक, स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, काव्य रत्नावली चौक, मू.जे. महाविद्यालय चौक, बहिणाबाई उद्यान चौक, जे. डी.सी.सी.बँक चौक, रिंग रोड चौक, नूतन मराठा महाविद्यालय चौक या ठिकाणी त्वष्टा तांबट समाज विकास मंडळाचे कार्यकर्ते, बहुभाषिक ब्राह्मण महासंघ यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठांनी धर्मध्वज पूजन करून पुष्पवृष्टी केली.

वाहन फेरीमध्ये सहभागी धर्मप्रेमी

सभेचे प्रमुख वक्ते

‘सुदर्शन न्यूज चॅनल’चे हिंदुत्वनिष्ठ संपादक श्री. सुरेश चव्हाणके, सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांचे जाज्वल्य मार्गदर्शन लाभणार आहे.

सभेचा दिनांक, वेळ आणि पत्ता

दिनांक : २५ डिसेंबर २०२२

वेळ : सायंकाळी ५.३० वाजता

स्थळ : शिवतीर्थ मैदान, जळगाव.